fbpx
Monday, October 2, 2023
Latest NewsPUNE

आशय संपन्न कलाच समाजाला योग्य दिशा दाखवू शकते – गिरीश कुलकर्णी

पुणे : कलेमध्ये जर आशय असेल तर ती कला चिरकाल लक्षात राहते, परंतु सध्या मात्र समाज माध्यमाच्या काळात आशयापेक्षा सादरीकरणाला अधिक महत्त्व दिले जात आहे. त्यामुळे कलेचे अस्तित्वही मर्यादित राहिले आहे. कला जिवंत राहण्यासाठी त्याला योग्य शिक्षणाची गरज आहे, अशा प्रकारची आशय संपन्न कलाच समाजाला योग्य दिशा दाखवू शकते, असे मत अभिनेते आणि दिग्दर्शक गिरीश कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या युवा महोत्सवाचे पारितोषिक वितरण गिरीश कुलकर्णी यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. एरंडवणे येथील शैक्षणिक संकुलात महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, भारती विद्यापीठाचे रजिस्ट्रार जी. जयकुमार, भारती विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्टसचे संचालक प्रा.शारंगधर साठे, यशवंतराव मोहिते कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्सचे प्राचार्य विवेक रणखांबे, ज्येष्ठ निवेदक राजेश दामले यावेळी उपस्थित होते.

एकूण २७ कला प्रकारांमध्ये घेतलेल्या या महोत्सवात विद्यापीठाच्या स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सने १७ ट्रॉफी मिळून चॅम्पियनशिप ट्रॉफी पटकाविली.

गिरीश कुलकर्णी म्हणाले, सध्या लवकर प्रसिद्धी मिळावी, यासाठी अनेक जण प्रयत्न करताना दिसत आहेत, परंतु असे करताना कलेतील आशय मात्र विसरून जातात, यामुळे कलेचे आयुष्य मर्यादित राहते. कोणत्याही कलेचे शिक्षण घेण्यासाठी काही ठराविक कालावधी लागतो परंतु ती पूर्णतः आत्मसात होतेच असे नाही. कोणतीही कला ही केवळ माणूस घडवत नाही तर एक प्रकारे समृद्ध समाज घडवत असते. आशयसंपन्न कला ही समाजाला नेहमीच मार्गदर्शक ठरते.

आज विविध माध्यमातून समाजाला दुभंगण्याचे काम केले जात आहे, अशावेळी कलाकारच आपल्या कलेच्या माध्यमातून सर्व समाजाला एकसंध ठेवण्याचे काम करू शकतो, त्यामुळे भारती विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स सारख्या संस्था आणि या संस्थांद्वारे आयोजित करण्यात येणारा युवा महोत्सवाची समाजाला अधिक गरज आहे, त्यामधूनच भविष्यातील समृद्ध समाज घडू शकेल, असा विश्वासही गिरीश कुलकर्णी यांनी यावेळी व्यक्त केला

प्रा. शारंगधर साठे म्हणाले, माणसाच्या संवेदना जागृत करण्यासाठी कलेची आवश्यकता असते. या महोत्सवाच्या माध्यमातून या कलांची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी आणि त्यामधून केवळ कलाकारच नव्हे तर एक चांगले व्यक्ती घडावेत याची अपेक्षा आहे. कलेच्या माध्यमातून केवळ विद्यार्थीच घडत नाही तर त्यांचा व्यक्तिमत्व विकास करण्यासाठी ही मदत होते, प्रत्येक जण हा सर्जनशील असला पाहिजे तरच सशक्त समाजाची निर्मिती होऊ शकते. या महोत्सवाच्या माध्यमातून सर्वच कलाकार होऊ शकत नाहीत परंतु कलासक्त व्यक्तिमत्व निश्चितच निर्माण होऊ शकते, अशी आमची या महोत्सवाच्या आयोजनामागील भूमिका आहे.

तीन दिवस सुरू असलेल्या या महोत्सवामध्ये घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण यावेळी गिरीश कुलकर्णी आणि डॉ. शिवाजीराव कदम यांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. विवेक रणखांबे यांनी आभार मानले.

Leave a Reply

%d bloggers like this: