fbpx
Monday, October 2, 2023
Latest NewsPUNE

गणेशोत्सवात ४०  मोफत रुग्णवाहिका आणि ७५ बाइक रायडर्स वैद्यकीय सुविधेसाठी सज्ज

पुणे : मानाचा चौथा गणपती श्री तुळशीबाग सार्वजनिक गणपती मंडळ ट्रस्ट, हुतात्मा बाबू गेनू मंडळ ट्रस्ट, श्री गजलक्ष्मी ट्रस्ट आणि आम्ही पुणेकर संस्था यांच्या वतीने आणि रायडर्स आॅफ दक्खन यांच्या सहकार्याने ७५ रायडर्स गणेशोत्सवात वैद्यकीय सेवेसाठी सज्ज झाले आहेत.  गणेशोत्सवात गर्दीच्या विविध ठिकाणी ४० रुग्णवाहिका देखील उपलब्ध करून देण्यात येणार असून ज्या ठिकाणी रुग्णवाहिका पोहोचू शकत नाही, तिथे दुचाकीस्वार वैद्यकीय सुविधा देणार आहेत.

आरोग्यसेवा आपल्या दारी अंतर्गत या अभियानाचा शुभारंभ पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते फरासखाना पोलीस स्टेशन येथून झाला. यावेळी पोलिस उपायुक्त संदीपसिंह गील, तुळशीबाग सार्वजनिक गणपती मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष विकास पवार,  हुतात्मा बाबू गेनू मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब मारणे, आम्ही पुणेकर संस्थेचे हेमंत जाधव, नितीन पंडित, गजलक्ष्मी ढोल ताशा पथकाचे प्रमुख केतन देशपांडे, साई सामाजिक सेवा संस्थेचे श्रीनिवास काबरा, संदीप खर्डेकर उपस्थित होते.

डॉ. प्रियांक जावळे, विठ्ठल बोडखे, नानासाहेब ओव्हाळ, डॉ. सुनील केलगणे, डॉ. स्वप्नाली जेंगते,  विशाल रेड्डी, राम झाकडे, सत्यवान लंगर यांची टीम उपक्रमात सक्रिय कार्यरत राहणार आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले, जीवनाची अनिश्चितता वाढली आहे. गणेशोत्सवाच्या गर्दीत वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत वेळेत उपचार मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी आम्ही पुणेकर आणि इतर संस्थांनी जो उपक्रम राबविला आहे, तो अतिशय कौतुकास्पद आहे.  गणपती पहायला येताना धक्काबुक्की करु नका, एकमेकांना सहकार्य करा, असेही त्यांनी सांगितले.

हेमंत जाधव म्हणाले, ६ रुग्णवाहिकांपासून  या उपक्रमाला सुरुवात झाली. आज ४० रुग्णवाहिका आहेत. गणेशोत्सवात आजपर्यंत हजारो नागरिकांना वेळेत वैद्यकीय उपचार मिळाले आहेत. तसेच ढोल ताशा पथकातील वादक,गणेश मंडळाचे कार्यकर्ते,अग्निशामक दलाचे जवान,पोलीस कर्मचारी,पोलीस मित्र,पत्रकार बांधव यांची आरोग्य तपासणी देखील करण्यात येते.

गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या संख्येने राज्यातील विविध भागातून गणेश भक्त पुण्यात येतात. अशावेळी आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना ही रुग्णवाहिका उपयुक्त ठरणार आहे. गरजूंनी १०८ नंबर वर संपर्क साधल्यास मोफत रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात येईल. फरासखाना पोलीस स्टेशन, बाबू गेनू, कसबा गणपती मंडळ, केसरीवाडा, गरुड गणपती, टिळक रस्ता, पुणे जिल्ह्यातील अष्टविनायक या ठिकाणी रुग्णवाहिका असणार आहे,

भाविकांनी १०८ क्रमांकावर संपर्क साधा. डॉक्टर, नर्स, प्रथमोपचार, आपत्कालीन सुविधा मोफत दिल्या जाणार आहेत.

Leave a Reply

%d bloggers like this: