नाटक प्रगल्भ झाले तर नियम आडकाठी ठरत नाहीत : विद्यानिधी वनारसे
पुणे : स्पर्धा म्हटली की यश-अपयश असतेच, ही सापेक्ष गोष्ट आहे. स्पर्धेतून समज, समस्या दूर करणे, संघ उभारणी, वक्तशीरपणा आणि सजगता या गोष्टी शिकायला मिळतात. आपल्याला नाटक काय सादर करायचे आहे याचा प्रत्येकाने विचार करणे आवश्यक आहे, जेणे करून स्पर्धेच्या चौकटीत आपल्याला काय राहून काय करता येते, हे समजू शकते. नाटक प्रगल्भ झाले तर नियमात राहून ते उत्तम रितीने सादर करता येते, असे प्रतिपादन ज्येष्ठ रंगकर्मी आणि एशिया पॅसिफिक ऑफ इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूटचे (आयटीआय-युनेस्को) उपाध्यक्ष विद्यानिधी (प्रसाद) वनारसे यांनी केले. सर्वच क्षेत्रात जागतिकीकरणाची चर्चा सुरू असताना नाट्य क्षेत्रात जागतिक पातळीवर काय सुरू आहे हे विद्यार्थ्यांनी जाणून घ्यायची नितांत गरज आहे, या मुद्द्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित 58व्या आंतर महाविद्यालयीन पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ आज (दि. 14) भरत नाट्य मंदिरात आयोजित करण्यात आला होता. पारितोषिक वितरण वनारसे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी त्यांनी स्पर्धक विद्यार्थ्यांशी संवाद साधला. महाराष्ट्रीय कलोपासकचे अध्यक्ष अनंत निघोजकर, अंतिम फेरीचे परीक्षक चंद्रशेखर कुलकर्णी, सुषमा सावरकर-जोग, दीपक रेगे, प्राथमिक फेरीचे परीक्षक मिलिंद कुलकर्णी, शेखर नाईक व्यासपीठावर होते. पारितोषिक स्वीकारल्यानंतर विद्यार्थ्यांनी ‘आव्वाज कुणाचा’ असा नारा देत एकच जल्लोष केला.
वनारसे पुढे म्हणाले, नाटक कला ही माणसा-माणसातील बात आहे. ही कला एक माणूस दुसऱ्या माणसासाठी सादर करत असताना तंत्राचा वापर करण्यास हरकत नाही; परंतु नाटकातून जे सांगायचे आहे ते समोरच्यापर्यंत पोहोचणे ही महत्त्वाची गोष्ट आहे. नाटकाविषयी सतत बोलले गेले पाहिजे, एकमेकांचे नाटक बघितले गेले पाहिजे, तालमी बघितल्या गेल्या पाहिजेत, यातून एकांकिका चांगल्या पद्धतीने सादर होण्यास नक्कीच मदत होते. पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत लेखन, दिग्दर्शन आणि अभिनय या गोष्टीला अधिक महत्त्व असल्याने उत्तम नाटक करण्यावर भर देऊन तंत्राच्या आहारी जाऊ नका असा सल्लाही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
स्पर्धेचे परीक्षक दीपक रेगे म्हणाले, नाटकासाठी प्रगल्भ संहितेची आवश्यकता आहे त्यातून अभिनय आणि दिग्दर्शन फुलले पाहिजे. एकांकिकेचा अभ्यास करणे गरजेचे आहे. या स्पर्धेसाठी प्रथम संहिता, वाचिक अभिनय, दिग्दर्शन या नंतर पूरक म्हणून तंत्राचा वापर करा.
स्पर्धेच्या निकालानंतर तर्कांना थारा देऊ नका, असे सांगून स्पर्धेचे परीक्षक मिलिंद कुलकर्णी म्हणाले, स्पर्धेत पारितोषिक मिळाले नाही तर आत्मपरीक्षण करा, स्पर्धेचे नियम समजावून घ्या, आपल्या एकांकिकेचा दर्जा काय आहे याचे भान ठेवा, स्पर्धेतील इतरांच्या एकांकिका बघा. ते पुढे म्हणाले, तंत्राचा अति वापर करताना आपली एकांकिका चित्रपट-मालिका याकडे झुकत नाही ना याचेही भान विद्यार्थ्यांनी ठेवणे आवश्यक आहे.
महाराष्ट्रीय कलोपासकचे चिटणीस ॲड. राजेंद्र ठाकूरदेसाई म्हणाले, संघ ज्यावेळी स्पर्धेत सहभाग नोंदवितो त्याच वेळी स्पर्धेच्या नियमांची माहिती दिली जाते. नियम एकदाच नाही तर तीन वेळा विद्यार्थ्यांना समजावून सांगितले जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांना नियम माहित नाही या म्हणण्याला काही अर्थ नाही. चुकीचे अर्थ काढत विद्यार्थ्यांनी मनानेच नियम बदल केले असल्यास कलोपासक त्यात काही करू शकत नाही.
मान्यवरांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष अनंत निघोजकर यांनी केला. सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन ॲड. राजेंद्र ठाकूरदेसाई यांनी केले. पारितोषिक वितरण समारंभापूर्वी स्पर्धेत पुरुषोत्तम करंडक पटकाविलेल्या ‘पिक्सल्स’ या एकांकिकेचे सादरीकरण टिळक आयुर्वेद महाविद्यालयाच्या संघाने केले.