अरविंद एज्युकेशन सोसायटी प्रशालेत हिंदी दिवस विविध उपक्रमांनी साजरा
पिंपरी : जुनी सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कूल व भारतीय विद्यानिकेतन विद्यालयात हिंदी दिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा आरती राव व सचिव प्रणव राव यांच्या हस्ते सरस्वती पूजन करून राष्ट्रीय हिंदी दिवस कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी लिटल फ्लॉवर स्कुलच्या मुख्याध्यापिका नीलम पवार, भारतीय विद्यानिकेतनच्या मुख्याध्यापिका आशा घोरपडे, पर्यवेक्षिका स्मिता बर्गे, शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
हिंदी दिवसाची माहिती शिक्षिका सोनिया गुरुंग, लखवीर कौर, दीपाली भदाणे यांनी दिली. विद्यार्थ्यांनी हिंदी भाषेचे महत्त्व, हिंदी कथा, इतनी शक्ती हमें देना दाता’ ही प्रार्थना, तसेच हिंदी कविता वाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सर्व स्पर्धकांनी सुरेख कविता सादर केल्या. पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी हिंदी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तसेच विद्यार्थ्यांनी मोबाईल फोन व टीव्हीच्या अतिवापराचे दुष्परिणाम यावर नाटक सादर केले.
आरती राव यांनी सांगितले, की हिंदी ही फक्त भाषा नसून समाजात व्यक्त होण्याचे सार्वत्रिक माध्यम आहे. प्रणव राव यांनी हिंदी भाषिक लेखकांच्या कार्याची माहीती दिली.
सूत्रसंचालन कौस्तुभ कोटीवाले, खुशबू चौधरी, कार्तिकी जाधव या विद्यार्थ्यांनी, तर आभार शिक्षिका सोनिया गुरुंग व ज्योती फर्टीयाल यांनी मानले.