संभाजी भिडे यांच्यासह समर्थकांवर गुन्हा दाखल
पुणे – पुण्यातील मांजरी येथे पोलीस विभागाची परवानगी न घेता बेकादेशीरपणे जमाव जमवून सभा घेतल्याप्रकरणी श्री शिवप्रतिष्ठानचे संस्थापक मनोहर उर्फ संभाजी भिडे यांच्यासह आयोजक राजेंद्र आव्हाळे व राहुल उंद्रे तसेच माऊली लॉन्स चे मालक बाबासाहेब नेवाळे यांच्यासह शंभर ते दीडशे अनोळखी व्यक्तीविरुद्ध लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संभाजी भिडे यांच्या पुण्यातील सभेला अनेक पुरोगामी संस्था संघटना यांनी विरोध केला होता. संभाजी भिडे यांचा हा कार्यक्रम पुण्यात होऊ नये यासाठी पुणे पोलीस आयुक्तांना निवेदने देखील देण्यात आली होती. तरीदेखील आयोजकांनी पोलीस विभागाची कोणतीही परवानगी न घेता बेकायदेशीरपणे मांजरी कोलवडी रोड येथील माऊली लॉन्स येथे संभाजी भिडे यांची सभा घेतली. याप्रकरणी श्री शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्यासह सभेचे आयोजक व इतर शंभर ते दीडशे अनोळखी समर्थक यांच्या विरोधात महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १९५१ चे कलम ३७(१)(३),१३५ अन्वये पुणे शहरात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी दिलेल्या मनाई आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तसेच या कार्यक्रमाला पोलीस परवानगी नसताना कार्यक्रमासाठी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल माऊली लॉन्सचे मालक बाबासाहेब नेवाळे यांच्याविरुद्ध देखील लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस नाईक रितेश काळे यांनी फिर्याद दिली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल पवार करीत आहेत.
