fbpx
Saturday, September 30, 2023
Latest NewsPUNE

ज्येष्ठ गोंधळी कोंडीबा पाचंगे यांना यंदाचा लोकशिक्षक पुरस्कार प्रदान 

पुणे : शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी, सेवा मित्र मंडळ ट्रस्ट आणि ठाकूर परिवाराच्यावतीने ज्येष्ठ शाहीर व शिक्षक कै. शशिकांत ठाकूर यांच्या स्मरणार्थ यंदाचा लोकशिक्षक पुरस्कार जागरण गोंधळ या पारंपरिक लोककलेतून अनेकांना प्रशिक्षण देणारे ज्येष्ठ गोंधळी कोंडीबा पाचंगे यांना प्रदान करण्यात आला. सिंहगड रस्त्यावरील पाचंगे यांच्या निवासस्थानी हा कार्यक्रम पार पडला.

पुणे विद्यार्थी गृहाचे कार्याध्यक्ष सुनिल रेडेकर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी प्रबोधिनीचे अध्यक्ष आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे, सेवा मित्र मंडळाचे शिरीष मोहिते, ढोल-ताशा महासंघ महाराष्ट्र अध्यक्ष पराग ठाकूर, आनंद सराफ आदी उपस्थित होते. सिंहगड रस्त्यावरील पाचंगे यांच्या निवासस्थानी राष्ट्रीय कला अकादमीचे अध्यक्ष अमर लांडे यांनी रांगोळी काढली. दाराला मांगल्याचे तोरण लावून मानाचा फेटा, स्मृतिचिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.

सुनिल रेडेकर म्हणाले, नवीन शैक्षणिक धोरणात लोककलांना महत्व येणार आहे. त्यामुळे युवा पिढीला पारंपरिक कलांचे शिक्षण देणे गरजेचे आहे. त्यासाठी तसेच आपल्या संस्कृतीचा वारसा पुढे नेण्यासाठी पाचंगे यांच्यासारख्या ज्येष्ठांचा उपयोग होणार आहे.

आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे म्हणाले, लोककलेची पारंपरिकता व शुद्धता जतन करणे हे लोककलावंतांचे काम आहे. ते कार्य पाचंगे यांनी केले असून पुढच्या पिढीमध्ये देखील ही कला प्रवाहित करण्यास प्रयत्नशील आहेत. त्यामुळे हा पुरस्कार त्यांना देत आहोत, असेही त्यांनी सांगितले. उपक्रमासाठी सेवा मित्र मंडळाचे अध्यक्ष गणेश सांगळे, कौशल पाचंगे यांनी विशेष परिश्रम घेतले. पराग ठाकूर यांनी प्रास्ताविक केले. शिरीष मोहिते यांनी आभार मानले.

Leave a Reply

%d bloggers like this: