Monday, October 5, 2026
Latest NewsPUNE

पुण्यातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या उद्योजक समुदायांपैकी एक म्हणून ४११ फाउंडर्स क्लबचा उदय

पुणे  : अवघ्या सहा महिन्यांत ४११ फाउंडर्स क्लब हा पुण्यातील वेगाने वाढणाऱ्या उद्योजक समुदायांपैकी एक म्हणून उदयास आला आहे. आतापर्यंत ७ हजारांहून अधिक उद्योजकांनी या व्यासपीठावर नोंदणी केली असून आठ विशेष फाउंडर्स एडीशन्सच्या माध्यमातून ६०० हून अधिक उद्योजक, गुंतवणूकदार, उद्योग नेते, क्रिएटर्स आणि विविध क्षेत्रांतील व्यावसायिक एकत्र आले आहेत.

देवयानी पवार आणि पवन रोचवानी यांनी उद्योजकांमध्ये विश्वास, अनुभवांची देवाणघेवाण आणि मुक्त संवाद घडवून आणण्यासाठी ४११ फाउंडर्स क्लबची स्थापना केली. पारंपरिक नेटवर्किंगच्या पलीकडे जाऊन उद्योग उभारताना येणाऱ्या प्रत्यक्ष अडचणी, निर्णय, अपयश आणि त्यातून मिळालेले धडे यांवर अर्थपूर्ण चर्चा घडवून आणणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

या समुदायात प्रारंभिक टप्प्यातील स्टार्टअप संस्थापक, वाढीच्या टप्प्यातील उद्योजक, व्हेंचर कॅपिटलद्वारे समर्थित स्टार्टअप्स, पारंपरिक उद्योगांचे प्रतिनिधी, दुसऱ्या पिढीतील उद्योजक, गुंतवणूकदार, ऑपरेटर्स आणि क्रिएटर्स सहभागी झाले आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता, माहिती तंत्रज्ञान, फिनटेक, एडटेक, उत्पादन क्षेत्र, डी-टू-सी, कन्झ्युमर ब्रँड्स, आरोग्यसेवा, अ‍ॅग्री-टेक, हवामान, रिअल इस्टेट, मीडिया, मार्केटिंग, कंटेंट क्रिएटर, इकॉनॉमी आणि शाश्वत विकास अशा विविध क्षेत्रांचे प्रतिनिधित्व या समुदायात आहे.

गेल्या सहा महिन्यांत चितळे बंधूंचे इंद्रनील चितळे, काइनेटिक समूहाच्या आरझू अलीम फिरोदिया, प्राची शेवगावकर (कूल द ग्लोब), सिद्धांत भालिंगे (उगाओ), सायली मराठे (हाऊस ऑफ आद्या), आदित्य गणेशवाडे (अटेन्क्स जिम), कबीर काटे (सॉलिटेरिओ डायमंड्स), ओंकार जाधव (अमुक तमुक), हर्षिता शोरवाला (केक डिओर) आणि सिद्धार्थ महाडिक (ले प्लाझिर) यांच्यासह अनेक उद्योजकांनी या उपक्रमात सहभाग घेतला आहे.

४११ फाउंडर्स क्लबच्या सह-संस्थापक देवयानी पवार म्हणाल्या, “उद्योजकांना भेटीगाठींसाठी अनेक व्यासपीठे उपलब्ध असली, तरी व्यवसाय उभारताना येणाऱ्या खऱ्या आव्हानांवर मनमोकळा संवाद साधण्याची संधी फार कमी मिळते. गेल्या सहा महिन्यांत हजारो उद्योजकांनी नोंदणी करून या समुदायाचा भाग बनण्याचा निर्णय घेतला, हीच अशा व्यासपीठाची गरज अधोरेखित करणारी बाब आहे.”

स्पर्धेपेक्षा सहकार्याची भावना वाढीस लागावी, यासाठी ४११ फाउंडर्स क्लबने विविध क्षेत्रांतील उद्योजक, ऑपरेटर्स आणि क्रिएटर्स यांना एकत्र आणले आहे. उद्योग उभारणीतील प्रत्यक्ष अनुभव, यश-अपयशातून मिळालेले धडे आणि व्यावहारिक मार्गदर्शन एकमेकांशी शेअर करण्यावर या उपक्रमात भर दिला जात आहे, असे देवयानी पवार यांनी नमूद केले.

या उपक्रमाच्या पुढील टप्प्यात फाउंडर्स लॅब आणि लेगसी टेबल हे दोन नवे उपक्रम सुरू करण्यात येणार आहेत. फाउंडर्स लॅब अंतर्गत यशस्वी कंपन्यांच्या उभारणीमागील निर्णय, आव्हाने, कार्यसंस्कृती आणि संस्थापकांचा प्रवास उलगडला जाणार आहे. तर लेगसी टेबल या उपक्रमातून भारतातील नामांकित उद्योग घराण्यांच्या दोन-तीन पिढ्यांमध्ये उद्योजकता, नेतृत्व, उत्तराधिकार, नवकल्पना आणि कौटुंबिक मूल्यांवर मुक्त चर्चा घडवून आणली जाणार आहे, अशी माहिती देवयानी पवार यांनी दिली.

उद्योजकीय अनुभव आणि ज्ञान अधिकाधिक इच्छुक उद्योजकांपर्यंत पोहोचविणे, तसेच यशस्वी उद्योगांच्या मागील विचारप्रक्रिया, मूल्यव्यवस्था आणि कार्यपद्धती यांचे दस्तऐवजीकरण करणे, हे ४११ फाउंडर्स क्लबचे दीर्घकालीन उद्दिष्ट असल्याचे संस्थेने सांगितले.

पुण्यातील स्टार्टअप परिसंस्थेकडून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद, झपाट्याने वाढणारा सदस्यवर्ग आणि उद्योजकीय ज्ञान जतन करण्याची व्यापक दृष्टी यामुळे ४११ फाउंडर्स क्लब शहरातील नव्या पिढीतील उद्योजकांसाठी महत्त्वाचे व्यासपीठ म्हणून उदयास येत आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading