Tuesday, October 6, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

मतदार यादीवरील विरोधकांचा मुद्दाच संपला; चित्रा वाघ यांचा ठाकरे बंधूंवर निशाणा

मुंबई : मतदार यादीतील वगळलेली नावे पुन्हा समाविष्ट करण्यासाठी निवडणूक आयोगाने बीएलओंमार्फत घरोघरी विशेष पडताळणी मोहीम हाती घेण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाविरोधात आंदोलन करणाऱ्या विरोधकांकडे आता कोणताही ठोस मुद्दा उरलेला नाही, असा दावा भाजप नेत्या आणि आमदार चित्रा वाघ यांनी केला.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर विरोधकांकडून सातत्याने आरोप केले जात होते. मात्र, मतदारांची नावे पुन्हा जोडण्यासाठी आयोगाने घेतलेला निर्णय पारदर्शक प्रक्रियेचे उदाहरण असल्याचे वाघ यांनी म्हटले. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे महाराष्ट्रातून ३० खासदार निवडून आले. त्यावेळी याच मतदार यादीवर प्रश्न उपस्थित करण्यात आला नव्हता. मग विधानसभा निवडणुकीच्या वेळी हीच यादी अचानक बनावट कशी ठरली, असा सवाल त्यांनी केला.

कर्नाटक आणि तेलंगणातील निवडणुकांमध्ये विरोधक विजयी झाले तेव्हा निवडणूक आयोग योग्य होता; मात्र महाराष्ट्रात पराभव झाल्यानंतर आयोगावरच संशय घेतला जात आहे, असा आरोप वाघ यांनी केला. लोकसभा निवडणुकीत भाजपला अपेक्षित यश मिळाले नाही, तरी पक्षाने जनतेमध्ये जाऊन काम केले आणि त्यानंतर ७१ लाख अतिरिक्त मते मिळवत जनतेचा विश्वास पुन्हा संपादन केला, असे त्यांनी सांगितले.

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यावरही वाघ यांनी टीका केली. कालपर्यंत एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणारे ठाकरे बंधू आता राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी एकत्र आले असल्याचा दावा त्यांनी केला. आगामी निवडणुकीतील संभाव्य पराभवाचे खापर आधीच निवडणूक आयोग आणि ईव्हीएमवर फोडण्याची तयारी सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला.
जनतेचा कौल स्वीकारण्याची तयारी नसल्यामुळे विरोधकांना मोर्चांचा आधार घ्यावा लागत असल्याचे वाघ म्हणाल्या. दोन्ही ठाकरे बंधूंना आता एकमेकांच्या राजकीय आधाराची गरज भासत असली, तरी महाराष्ट्रातील जनता सुज्ञ असून अशा राजकीय भूमिकेला बळी पडणार नाही, असा दावा त्यांनी केला.
निकाल आपल्या बाजूने लागला तर निवडणूक आयोग निष्पक्ष आणि विरोधात निकाल गेल्यास आयोगावर आरोप, हा दुटप्पीपणा स्वीकारला जाणार नाही, असेही चित्रा वाघ यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading