Sunday, November 29, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

डिलिमिटेशनच्या नावाखाली देश केंद्रशासित करण्याचा भाजपचा डाव; उत्तर-दक्षिण संघर्षाची ठिणगी पडू शकते : राज ठाकरे

मुंबई : मतदारसंघ पुनर्रचना (डिलिमिटेशन) आणि महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्र सरकार आणि भाजपवर जोरदार टीका केली. देशातील खासदारांची संख्या वाढवण्याची गरज काय, असा सवाल करत डिलिमिटेशनच्या माध्यमातून संपूर्ण देश केंद्राच्या नियंत्रणाखाली आणण्याचा डाव असल्याचा आरोप त्यांनी केला. या प्रक्रियेमुळे राज्यांवर अन्याय होऊ शकतो आणि भविष्यात उत्तर विरुद्ध दक्षिण असा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता असल्याचेही ठाकरे यांनी व्यक्त केले.
डिलिमिटेशनचा मुद्दा सध्या का पुढे आणला जात आहे, हे जनतेने समजून घेतले पाहिजे, असे ठाकरे म्हणाले. महिला आरक्षणाच्या नावाखाली नेमके काय साध्य केले जाणार आहे, असा प्रश्न उपस्थित करत सध्या लोकसभेत 543 खासदार आहेत. त्यांनी काय काम केले आहे, की आणखी खासदार वाढवण्याची गरज भासत आहे, असा टोला त्यांनी लगावला. या प्रक्रियेमुळे राज्यांना आर्थिक स्वायत्तता मिळणार आहे का, असा सवालही त्यांनी केला.
केंद्र सरकारकडून राज्यांचे अधिकार कमी करून संपूर्ण देश केंद्राच्या नियंत्रणाखाली ठेवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप ठाकरे यांनी केला. या प्रक्रियेत दक्षिणेकडील राज्यांसह महाराष्ट्रावरही अन्याय होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. भविष्यात उत्तर आणि दक्षिण भारतामध्ये संघर्ष निर्माण होऊ शकतो, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. या संदर्भात आपण 2018 पासून भूमिका मांडत असल्याचे ठाकरे म्हणाले.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालावरही ठाकरे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. महायुतीला विधानसभेत 232 जागा मिळाल्या, मात्र या निकालाबाबत अनेक प्रश्न असल्याचा दावा त्यांनी केला. निवडणुकीतील प्रक्रियेवर विश्वास राहिलेला नाही, असे सांगत त्यांनी निवडणूक आयोगावरही टीका केली. मतदानाच्या शेवटच्या तासात अचानक मतदान वाढल्याचा मुद्दा उपस्थित करत ठाण्यात शेवटच्या तासात 80 ते 85 हजार मतदान कसे झाले, असा सवाल त्यांनी केला. हा प्रकार नेमका कसा घडला आणि त्यामागे कोण होते, याचे स्पष्टीकरण मिळायला हवे, असे ते म्हणाले.
राजकारणात सत्ता आणि पैशाचे समीकरण अधिक प्रभावी होत असल्याची टीका करत सत्ता मिळवणे आणि त्यातून पैसा कमावणे, हेच राजकारण सुरू असल्याचे ठाकरे म्हणाले. मतदारांनी निवडणूक प्रक्रियेबाबत आणि राजकीय पक्षांच्या भूमिकेबाबत जागरूक राहण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
अजित पवार भाजपसोबत गेले, त्यावेळी आपण केलेल्या ट्विटचा संदर्भ देत ठाकरे म्हणाले की, पहिली टीम सत्तेच्या दिशेने रवाना झाली असून त्यानंतर दुसरी टीमही जाऊ शकते, असे आपण त्यावेळी म्हटले होते. आता या राजकीय घडामोडींना हळूहळू आकार येत असून, पुढील परिस्थिती स्पष्ट झाल्यानंतर त्यावर भाष्य करता येईल, असे त्यांनी सांगितले.
शरद पवार यांच्यावरही राज ठाकरे यांनी टीका केली. जंतरमंतरवरील आपल्या पूर्वीच्या वक्तव्याचा संदर्भ देत त्यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. ‘खोकायंत्र दिशा दाखवते, पण हे धोकायंत्र आहे,’ अशी टीका त्यांनी केली.
डिलिमिटेशन, निवडणूक प्रक्रिया आणि राजकीय सत्ताकारण या मुद्द्यांवरून राज ठाकरे यांनी सरकारवर टीकेची झोड उठवली असून, या विषयांवर जनतेने विचार करून भूमिका घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले.

Leave a Reply