Saturday, May 9, 2026
Latest NewsMAHARASHTRA

Crime News : सेक्स्टॉर्शनच्या त्रासाला कंटाळून युवकाची आत्महत्या

रत्नागिरी : अलीकडे सोशल मीडियाच्या चुकीच्या पद्धतीने वापरामुळे हनी ट्रॅपचे प्रकार वाढू लागले आहेत. असाच एक धक्कादायक प्रकार कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण तालुक्यात घडला आहे. चिपळूण तालुक्यात शिरगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत तिवरे येथील एका १९ वर्षीय युवकाने याच प्रकाराला कंटाळून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

९ ऑगस्ट रोजी या तरुणाने सेक्स्टॉर्शनच्या छळाला कंटाळून गळफास घेत आत्महत्या केली आहे. या प्रकरणी आता चिपळूण पोलिसांनी राजस्थान येथील तीन संशयित आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. या सगळ्या धक्कादायक घटनेमुळे चिपळूण तालुक्यात खळबळ उडाली आहे.

तिवरे या गावातील एक युवक सेक्सटॉर्शनच्या कचाट्यात सापडला आणि ब्लॅकमेल आणि धमकीमुळे शेवटी त्याने आत्महत्या केली. आतापर्यंत मुंबईसारख्या शहरात घडणा-या या घटनांचे लोण आता ग्रामीण भागापर्यंत पसरले आहे.

राजस्थानातील एका टोळीने चिपळूण तालुक्यातील तिवरे या गावातील एका युवकाला सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकवले. त्याचे अश्लील व्हीडीओ अपलोड करण्याची धमकी देऊन त्याच्याकडे पैशाची मागणी केली. सदर तरुणाने ११ हजार रुपयांची खंडणीही दिली. परंतु त्रास वाढू लागल्यानंतर त्याला कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

या प्रकरणी राजस्थान येथील १८ वर्षीय तरुणासह अन्य तिघे अनोळखी मोबाईल क्रमांक धारकांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अलोरे-शिरगाव पोलिस स्थानकात गुन्हा दाखल झाला आहे. किशनराम भन्वरलाल पातीर (१८, बिकानेर-राजस्थान) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. १९ वर्षीय तरुणाशी सेक्स्टॉर्शन करणा-या टोळीने चिपळुणातील त्या तरुणाशी सोशल मीडियाव्दारे ओळख केली.

तसेच त्याच्यासोबत अश्लील व्हीडीओद्वारे संपर्क केला. त्यानंतर मात्र त्याचे स्क्रीनशॉट तसेच व्हीडीओ रेकॉर्ड करून त्याद्वारे या तरुणाला ब्लॅकमेल करत हे फोटो व व्हीडीओ यूट्यूबवर अपलोड करण्याची तसेच सोशल मीडियावर टाकण्याची धमकी दिली होती. या सगळ्या प्रकरणाचा अधिक तपास चिपळूण तालुका पोलिस निरीक्षक रवींद्र शिंदे करत आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading