Saturday, May 9, 2026
ENTERTAINMENTLatest News

आई, घराची ‘सीईओ’ आणि आयुष्याची ‘डायरेक्टर’; पाहा तुमच्या आवडत्या अभिनेत्री काय म्हणतात…

प्रत्येकाच्या यशामागे आणि उत्तम व्यक्तिमत्वामागे एका माऊलीचे हात असतात. आई ही घराची ‘सीईओ’ असते जी संपूर्ण कुटुंब नियोजनाने सांभाळते आणि ‘डायरेक्टर’ बनून आपल्या आयुष्याला मूल्यांची योग्य दिशा देते. आजच्या धावपळीच्या जगात आपण कितीही मोठे झालो, तरी आईने दिलेल्या संस्कारांची शिदोरीच आपल्याला योग्य वाट दाखवत असते. मातृदिनाच्या निमित्ताने, आपल्या आवडत्या अभिनेत्रींनी त्यांच्या आईबद्दल व्यक्त केलेले हे कृतज्ञतेचे आणि प्रेमाचे शब्द, आई या नात्याचा महिमा अधोरेखित करतात.

‘कमळी’ मालिकेतील कमळी म्हणजेच विजया बाबर सांगते की, तिच्या कुटुंबात आजही सर्व सण अतिशय पारंपरिक पद्धतीने साजरे केले जातात. मुंबईत राहूनही गावाची परंपरा जपण्याचे संस्कार आईकडून मिळाले आहेत. सणांचा उत्साह आणि त्यामागचे महत्त्व मला मनापासून उमजले आहे. तिच्या स्वभावात असलेला ‘हट्टीपणा’ हा नकारात्मक नसून, आईकडून मिळालेला जिद्दीपणा आणि ध्येय गाठण्याची सकारात्मकता आहे. आईमुळेच माणसं जोडण्याची कला मी  शिकली आहे. आई गृहिणी असताना घराची सर्व कामे सांभाळून शिवणकामाचा छंद जोपासायची, हे पाहून मला वाटते की आई होणं हीच मुळात मोठी जबाबदारी आहे. देवाला सगळीकडे पोहोचणे शक्य नव्हते म्हणून त्याने आई घडवली, त्यामुळे आईला घराची सीईओ आणि संस्कारांची डायरेक्टर म्हणणे अगदी योग्य आहे.

‘सनई चौघडे’ मधली पमा म्हणजेच मेघना एरंडे जोशी यांच्या मते आई ही कुटुंबाची आधारस्तंभ असून ती योग्य दिशा दाखवत असते. आई झाल्यानंतर  माझ्या  आयुष्यात कोणताही छंद मागे सुटला नाही, उलट मुलीच्या रूपात मी स्वतःचे बालपण पुन्हा अनुभवायला सुरुवात केली आहे. आई झाल्यामुळे माझ्यातील बेजबाबदारपणा जाऊन मी  अधिक समजूतदार आणि खंबीर झाली आहे. माझ्या मुलीच्या, इराच्या बाबतीत निर्णय घेताना मी आता खूप ठाम असते. आजच्या बदलत्या काळात ‘चांगुलपणा’ ही एकमेव शिदोरी मी आपल्या मुलीला देऊ इच्छिते. अनेक भूमिका निभावताना कुटुंबाचा दिवस आनंदात जावा, हाच माझा  मुख्य ध्यास असतो. शूटिंगला असताना सुद्धा आई म्हणून मी मुलीच्या अभ्यासाची आणि दिवसाची विचारपूस करत राहते. दिवस संपला की पुन्हा उद्याची तयारी सुरू होते. एकूणच, माझी मुख्य जबाबदारी म्हणजे माझ्या मुलीचा आणि जवळच्या माणसांचा दिवस अधिक चांगला कसा होईल, याचा सतत विचार करणे.

‘शुभ श्रावणी’ मालिकेतील श्रावणी म्हणजेच वल्लरी विराज म्हणते मला आईने एक मोलाची शिकवण दिली आहे. परिस्थिती कितीही कठीण असली तरी आपला मूळ स्वभाव आणि तत्वे कधीच सोडू नयेत. आईकडून मला  नियोजनबद्धता आणि शिस्त हे गुण वारसाहक्काने मिळाले आहेत, ज्याचा उपयोग  मला  आता मालिकेच्या शूटिंगच्या धावपळीत होतो. आईची कामातली निरंतरता आणि कधीही न थकण्याची वृत्ती मला  थक्क करते. लहानपणी मुलांच्या संगोपनासाठी आईचा निसर्गप्रेमाचा आणि बागकामाचा छंद मागे पडला होता, पण आता तो ती पुन्हा आनंदाने जोपासत आहे. आईशिवाय घराचं पानही हलत नाही, त्यामुळे तीच घराची खरी सीईओ आहे.  माझ्या स्वभावातील समजूतदारपणाचे पूर्ण श्रेय मी माझ्या आईला देईन.

‘तुला जपणार आहे’ मालिकेतील मीरा म्हणजेच महिमा म्हात्रे आपल्या कामाप्रती असलेल्या निष्ठेचे आणि प्रोफेशनल राहण्याचे सर्व श्रेय आईला देते. घोडेस्वारीचा सीन करताना अपघात होऊनही केवळ १५ दिवसांत मी  कामावर रुजू झाले, हे धाडस मला आईकडूनच मिळाले आहे. माझी आई केवळ गृहिणी नसून वडिलांच्या व्यवसायातही खांद्याला खांदा लावून काम करते. घर आणि व्यवसाय यांचा समतोल कसा साधावा, हे मला आईकडून शिकायला आवडेल. सुरुवातीला शिक्षिका असलेल्या आईने संसारासाठी नोकरी सोडली, तरी हार न मानता व्यवसायात यश मिळवले, याचा मला अभिमान वाटतो. नुकताच माझा  साखरपुडा झाला आहे,  लग्नानंतर  घरच्या माणसांना आणि विशेषतः आईच्या हातच्या जेवणाला मी खूप मिस करेन. तरीही माझ्या आयुष्यातील प्रत्येक संकटात आईचे मार्गदर्शन आणि ‘ट्रिक्स’ सोबत असतीलच, असा तिला विश्वास आहे.

आईने जपलेल्या परंपरा आणि मूल्यांचा हा वारसा या अभिनेत्री केवळ आपल्या अभिनयातूनच नाही, तर आपल्या खऱ्या आयुष्यातूनही पुढे नेत आहेत. मातृदिनाच्या निमित्ताने या सर्व माऊलींना आणि त्यांच्या अफाट कष्टांना मानाचा मुजरा!

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading