Thursday, July 2, 2026
ENTERTAINMENTLatest NewsMAHARASHTRATOP NEWS

नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘खाशाबा’ चा दमदार टीझर आऊट

जिओ स्टुडिओज आणि आटपाट प्रॉडक्शन्स यांनी आज बहुप्रतिक्षित “खाशाबा” चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर रिलीज करत , १ जानेवारी २०२७ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार असल्याची अधिकृत माहिती दिली.

‘धुरंधर’, ‘धुरंधर : द रिव्हेंज’ आणि ‘राजा शिवाजी’ यासारखे सलग यशस्वी चित्रपट देत, भारतीय चित्रपटसृष्टीत आपले वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या जिओ स्टुडिओजने आणखी एक महत्त्वाकांक्षी निर्मिती केली आहे. फॅन्ड्री आणि ‘सैराट’ सारख्या राष्ट्रीय आणि अंतरराष्ट्रीय स्तरावर गौरवलेल्या चित्रपटांनंतर दिग्दर्शक नागराज मंजुळे “खाशाबा” निमित्त पुन्हा एकदा एका भव्य आणि प्रेरणादायी कथेसह प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत.

चित्रपटगृहांमध्ये प्रथम प्रदर्शित झालेल्या खाशाबा च्या टिझरला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. आता तो डिजिटल प्लॅटफॉर्मसवर रिलीज करण्यात आला आहे. पारंपरिक कुस्तीच्या आखाड्याचे भव्य चित्रण, दमदार दृश्यरचना, उत्कंठावर्धक वातावरण, संघर्षाची भावनिक तीव्रता आणि चित्रपटाचा सिनेमॅटिक आवाका या टीझर मधून प्रभावीपणे अनुभवायला मिळतो.

नव्याने स्वतंत्र झालेल्या भारताच्या पार्श्वभूमीवर घडणारा हा चित्रपट महाराष्ट्रातील संघर्षशील कुस्तीपटूची कहाणी सांगतो. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत १९५२ च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक पटकावत भारतीय क्रीडा इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद करणाऱ्या
खाशाबा दादासाहेब जाधव यांच्या प्रेरणादायी जीवनप्रवासावर आधारित आहे.

‘खाशाबा’ हा चित्रपट स्वतंत्र भारताला पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे महाराष्ट्राचे सुपुत्र आणि दिग्गज कुस्तीपटू खाशाबा दादासाहेब जाधव यांच्या प्रेरणादायी जीवनप्रवासावर आधारित आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यांनी १९५२ च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक पटकावले आणि भारतीय क्रीडा इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद होईल असा इतिहास घडवला. भारतीय क्रीडाक्षेत्रातील हा अभिमानास्पद प्रवास मोठ्या पडद्यावर भव्य स्वरूपात साकारत हा चित्रपट प्रादेशिक सिनेमातील सर्वात मोठ्या क्रीडापटांपैकी एक ठरण्याची क्षमता बाळगून आहे.

संगीत क्षेत्रातील दिग्गज जोडी अजय-अतुल यांनी चित्रपटाला संगीत दिले आहे. खाशाबा यांच्या भूमिकेसाठी एका नव्या चेहऱ्याची निवड करण्यात आली असून, त्याची घोषणा लवकरच करण्यात येईल. या नवोदित कलाकारासोबत त्याबरोबरच जितेंद्र जोशी, महेश मांजरेकर, गिरीश कुलकर्णी, संदीप कुलकर्णी, संदेश कुलकर्णी, सुरेश विश्वकर्मा, वैभव मांगले, छाया कदम, आणि गार्गी कुलकर्णी यांसारख्या एकापेक्षा एक दमदार कलाकारांचा सहभाग आहे.

जिओ स्टुडिओज आणि आटपाट प्रॉडक्शन्स प्रस्तुत ‘खाशाबा’ या चित्रपटाची निर्मिती ज्योती देशपांडे आणि गार्गी कुलकर्णी यांनी केली असून दिग्दर्शन नागराज मंजुळे यांचे आहे.

‘खाशाबा’ १ जानेवारी २०२७ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होण्यास सज्ज आहे.

https://bit.ly/KhashabaOfficialTeaser

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading