उबरतर्फे सुरक्षेच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत‘रेकॉर्ड माय राईड’ आणि ‘ॲम्ब्युलन्स असिस्टन्स’ सुविधा सुरू
पुणे : उबरने प्रवासी आणि चालकांसाठी प्रत्येक प्रवास अधिक सुरक्षित करण्याच्या उद्देशाने उद्योग क्षेत्रातील प्रथमच सादर करण्यात आलेल्या नव्या सुरक्षा सुविधांची आज घोषणा करत सुरक्षेच्या क्षेत्रातील मापदंड आणखी उंचावण्याचा आपला प्रयत्न पुढे सुरू ठेवला आहे. कंपनीने रेकॉर्ड माय राईड ही उद्योगातील प्रथमच सादर करण्यात आलेली सुविधा सुरू केली असून या सुविधेमुळे चालकांना प्रवासादरम्यान स्वतःच्या मोबाईल फोनचा वापर करून उबर ॲपमधून कॅबमधील एन्क्रिप्टेड व्हिडिओ सुरक्षितपणे रेकॉर्ड करता येणार आहे. जोडीला आपत्कालीन प्रतिसाद व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने उबरने वैद्यकीय लॉजिस्टिक्स सेवा पुरवठादार डायल 4242 यांच्याशी भागीदारी करून ॲम्ब्युलन्स असिस्टन्स ही सुविधा थेट आपल्या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून दिली आहे.
अलीकडील काही वर्षांमध्ये ऑडिओ रेकॉर्डिंग, वुमन रायडर प्रेफरन्स, हेल्मेट सेल्फी व्हेरिफिकेशन आणि सीटबेल्ट रिमाइंडर्स यांसारख्या सुरक्षा सुविधा उद्योगक्षेत्रात प्रथमच सादर करण्यात आल्या. प्रत्येक प्रवास अधिक सुरक्षित आणि जबाबदारीपूर्ण करण्यासाठी तंत्रज्ञानाधारित उपाययोजना आणि मानवी हस्तक्षेपांचा व्यापक संच उपलब्ध करून देत उबरने सुरक्षा क्षेत्रातील आपले नेतृत्व सातत्याने सिद्ध केले आहे. या नव्या सुविधा त्याच प्रयत्नांचा पुढील टप्पा आहेत.
तंत्रज्ञानापुरतेच मर्यादित न राहता, सुरक्षित प्रवासाला प्रोत्साहन देणाऱ्या भागीदारी आणि उपक्रमांमध्येही उबर सातत्याने गुंतवणूक करत आहे. सुरक्षिततेला वेगापेक्षा प्राधान्य देण्याबाबत जनजागृती करण्यासाठी उबरने आपल्या प्लॅटफॉर्मचा वापर करत सडक सुरक्षा अभियान अंतर्गत रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाशी अभिमानास्पद भागीदारी केली आहे. त्याचबरोबर चालकांसाठी अधिक सुरक्षितता बळकट करण्याबरोबरच उबर फॉर टीन्स आणि उबर फॉर सीनियर्स यांसारख्या सेवांद्वारे कुटुंबांसाठी विशेष अनुभव विकसित करण्याचे कामही कंपनी सातत्याने करत आहे.
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, “वाहतूक नियमांचे पालन करणे, सीटबेल्ट आणि हेल्मेटचा वापर करणे या साध्या वाटणाऱ्या गोष्टी असल्या तरी रस्ते अपघातांमधील मृत्यूंचे प्रमाण कमी करण्यात त्यांची अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे. जनजागृती वाढविण्यासाठी आणि आपले रस्ते अधिक सुरक्षित करण्यासाठी तंत्रज्ञानाची महत्त्वपूर्ण भूमिका असू शकते. सडक सुरक्षा अभियान अंतर्गत उबरने केलेल्या सातत्यपूर्ण भागीदारीचे तसेच रस्ते सुरक्षेला प्रोत्साहन देणाऱ्या आणि आपत्कालीन परिस्थितीत अधिक प्रभावी मदत उपलब्ध करून देणाऱ्या नवकल्पना सादर करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांचे मी कौतुक करतो.”
उबर इंडिया आणि दक्षिण आशियाचे सुरक्षा संचालन विभाग प्रमुख सूरज नायर म्हणाले, “आज जे नाविन्यपूर्ण वाटते, ते उद्याचा अपेक्षित मापदंड बनते. सुरक्षा क्षेत्रातही अशीच प्रगती व्हायला हवी. याबाबतचा आमचा विचार अगदी स्पष्ट आहे –सुरक्षा क्षेत्रातील नवकल्पना या केवळ वेगळेपणा निर्माण करणाऱ्या सुविधा न राहता संपूर्ण उद्योगासाठी मूलभूत मापदंड बनल्या पाहिजेत. उद्योगातील प्रथमच सादर करण्यात आलेल्या आमच्या सुरक्षा सुविधा आणि भागीदारी या सुरक्षा मानके सातत्याने उंचावण्याच्या आमच्या बांधिलकीचे प्रतीक आहेत. अपेक्षा बदलत असताना संपूर्ण उद्योगक्षेत्रही त्या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी पुढे येईल अशी आम्हाला आशा आहे.”
नवीन सुविधा वैशिष्ट्ये:
रेकॉर्ड माय राईड: प्रवासादरम्यान असुरक्षित वाटल्यास चालक आता उबर ॲपद्वारे स्वतःच्या मोबाईल फोनचा वापर करून कॅबमधील एन्क्रिप्टेड व्हिडिओ सुरक्षितपणे रेकॉर्ड करू शकतात. हे रेकॉर्डिंग लागू असलेल्या कायद्यांनुसार पूर्णपणे अनुरूप असून ते एन्क्रिप्टेड असल्यामुळे चालक किंवा उबर यांपैकी कोणालाही ते पाहता येत नाही. चालकाने सुरक्षा अहवालाचा भाग म्हणून ते सादर करण्याचा निर्णय घेतल्यासच ते बघता येऊ शकते. त्यामुळे गोपनीयतेचे भक्कम संरक्षण सुनिश्चित होते.
ॲम्ब्युलन्स असिस्टन्स: डायल 4242 यांच्या भागीदारीत उबरने ॲम्ब्युलन्स असिस्टन्स सुविधा सुरू केली आहे. प्रवासादरम्यान अपघात झाल्यास प्रवासी आणि चालकांना तातडीने वैद्यकीय मदतीची विनंती करता यावी यासाठी प्लॅटफॉर्मवर ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही सुविधा उबरच्या सध्याच्या 24×7 सेफ्टी लाइनद्वारे उपलब्ध आहे.
डोन्ट टाइप अँड ड्राइव्ह: वाहन सुरु असताना, चालवताना एकाबाजूला संदेश टाइप करण्यामुळे लक्ष विचलित होऊ शकते. हे टाळण्यासाठी वाहन सुरू असताना उबर चालक ॲपमधील मॅन्युअल टायपिंगची सुविधा मर्यादित केली जाईल. संदेशाला उत्तर देण्यापूर्वी चालकांनी सुरक्षित ठिकाणी वाहन थांबवावे असा संकेतही ॲपद्वारे दिला जाईल.
सेट युवर ओन पिन: प्रवासी आता स्वतःचा स्वतंत्र ट्रिप व्हेरिफिकेशन पिन तयार करू शकतात, त्याचे व्यवस्थापन करू शकतात आणि तो अनिवार्यही करू शकतात. यामुळे प्रवासाच्या पडताळणी प्रक्रियेवर त्यांचे पूर्ण नियंत्रण राहील.
