बांधकाम कामगारांच्या सुरक्षिततेसाठी क्रेडाई पुणेकडून ‘साइट सेफ्टी ऑडिट’ उपक्रमाची सुरुवात
पुणे : बांधकाम क्षेत्रातील कामगारांची सुरक्षितता अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने क्रेडाई पुणेच्या लेबर वेल्फेअर कमिटीने सेफस्किल सेफ्टी सर्व्हिसेसच्या सहकार्याने ‘साइट सेफ्टी ऑडिट’ उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाचा शुभारंभ ३० जून रोजी महाळुंगे येथील गॉडरेज रिव्हर रॉयल या सिनर्जी एसकेआय इन्फ्रा डेव्हलपमेंट्सच्या प्रकल्पात झाला.
या उपक्रमाद्वारे बांधकाम स्थळांवर सुरक्षिततेबाबत जागरूकता वाढविणे, नियमित सुरक्षा तपासण्या करणे आणि सदस्य विकासकांना सर्वोत्तम सुरक्षा पद्धती अवलंबण्यास प्रोत्साहन देणे हा मुख्य उद्देश आहे. तसेच कामगारांची सुरक्षितता सुनिश्चित करताना शासकीय सुरक्षा नियमांचे पालन करण्यावरही भर दिला जाणार आहे.या सुरक्षा तपासणीत विद्युत सुरक्षा, उंच ठिकाणी करण्यात येणारे काम, उत्खनन, बांधकाम साहित्याची हाताळणी, तात्पुरते स्टेजिंग आणि स्कॅफोल्डिंग, अग्निसुरक्षा, जोखीम व्यवस्थापन तसेच यंत्रसामग्रीच्या सुरक्षिततेची पाहणी केली जाणार आहे.
यावेळी सिनर्जी एसकेआय इन्फ्रा डेव्हलपमेंट्सचे ऑपरेशनल डायरेक्टर श्री. संदीप शितोळे म्हणाले, “आम्ही गेल्या काही काळापासून सुरक्षिततेच्या दृष्टीने सातत्याने काम करत आहोत. मात्र क्रेडाईच्या माध्यमातून या उपक्रमाचे महत्त्व अधिक चांगल्या प्रकारे समजले. बांधकाम क्षेत्रातील विकासक, कंत्राटदार आणि इतर संबंधितांना प्रोत्साहन देण्याचे आणि सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण करण्याचे महत्त्वाचे काम क्रेडाई करत आहे. आम्ही करत असलेले प्रत्येक काम हे ग्राहक आणि समाजाच्या हितासाठीच असते.”
या ऑडिटमध्ये तज्ज्ञांकडून बांधकाम स्थळांची प्रत्यक्ष पाहणी केली जाईल. सुरक्षा कागदपत्रांची तपासणी करण्यात येईल तसेच अभियंते, सुरक्षा अधिकारी आणि कामगारांशी संवाद साधला जाईल. प्रत्येक प्रकल्पासाठी सविस्तर अहवाल तयार करून त्यामध्ये सुरक्षा नियमांचे पालन, आढळलेल्या बाबी आणि आवश्यक सुधारणा याबाबत सूचना दिल्या जाणार आहेत.या उपक्रमामुळे पुण्यातील बांधकाम प्रकल्पांमध्ये सुरक्षिततेचे निकष अधिक मजबूत होतील आणि कामगारांसाठी अधिक सुरक्षित व चांगले कार्यस्थळ निर्माण होण्यास मदत मिळेल. या उपक्रमाला क्रेडाई पुणेच्या सदस्य विकासकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
क्रेडाई पुणेचे अध्यक्ष श्री. मनीष जैन म्हणाले, “बांधकाम क्षेत्र देशातील सर्वाधिक रोजगार देणाऱ्या क्षेत्रांपैकी एक आहे. त्यामुळे प्रत्येक कामगाराची सुरक्षितता ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून विकासकांनी सर्वोच्च सुरक्षा मानके स्वीकारावीत, संभाव्य धोके वेळेवर ओळखावेत आणि सुरक्षित कामाचे वातावरण निर्माण करावे, अशी आमची अपेक्षा आहे. सुरक्षितता वाढल्यास कामाची गुणवत्ता आणि उत्पादकताही वाढते.”
क्रेडाई पुणेचे उपाध्यक्ष तसेच लेबर वेल्फेअर कमिटीचे अध्यक्ष श्री. जे. पी. श्रॉफ म्हणाले, “‘ऑडिट’ हा शब्द ऐकला की अनेकांना भीती वाटते. पण ऑडिट म्हणजे चुका शोधणे नव्हे, तर प्रत्यक्ष परिस्थिती समजून घेऊन सुधारणा करण्याची संधी शोधणे होय. सुरक्षा ऑडिटमुळे सर्वांनी मिळून अधिक सुरक्षित बांधकाम स्थळे उभारण्यास मदत होईल.”सेफ्टी टुडे, सिक्युअर्स टुमॉरो’ या संकल्पनेवर आधारित हा उपक्रम पुढेही सुरू राहणार असून, सुरक्षित आणि जबाबदार बांधकाम संस्कृतीला चालना देण्यासाठी क्रेडाई पुणे सातत्याने प्रयत्नशील राहणार आहे.
