Monday, October 12, 2026
Latest NewsPUNE

दृष्टीपलीकडच्या जिद्दीने साकारलेल्या कलाकृतींची ‘प्रोत्साहन’ प्रदर्शनातून पर्वणी

पुणे : दोन्ही डोळ्यांनी दिसत नसतानाही वायर बॅग तयार करणे, मण्यांचे कंदील बनविणे तसेच विविध शोभेच्या वस्तू बनविणे, अशी कामे सहजतेने करत अंध व दिव्यांग व्यक्तींनी आपल्या जिद्दीची आणि कौशल्याची झलक पुणेकरांसमोर सादर केली. त्यांच्या हातून साकारलेल्या वस्तूंमधून केवळ कलागुणच नव्हे, तर स्वावलंबी होण्याची उमेद आणि आत्मविश्वासही दिसून आला. पुणेकरांनीही या वस्तूंची खरेदी करत अंधभगिनींच्या कलेला आणि प्रयत्नांना ‘प्रोत्साहन’ दिले.

दिव्यांग व्यक्तींमधील कौशल्यांना व्यासपीठ मिळावे, त्यांनी स्वावलंबी व्हावे आणि समाजाला त्यांच्या क्षमतांची ओळख व्हावी, या उद्देशाने पुण्यातील समविचारी मैत्रिणींनी एकत्र येत ‘प्रोत्साहन २०२६’ या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. शनिवार, दि. १० ऑक्टोबर पर्यंत सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत कर्वे रस्त्याजवळील अश्वमेध हॉल येथे हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. महाराष्ट्रातील विविध भागांतील ३० दिव्यांग व्यक्ती आणि ८ संस्था या प्रदर्शनात सहभागी झाल्या असून प्रदर्शनाला विनामूल्य प्रवेश आहे.

प्रोत्साहन प्रदर्शनाचे उद्घाटन सेवासदन दिलासा कार्यशाळेच्या व्यवस्थापिका व म्युझिक थेरपिस्ट मेघना जोशी आणि विविध कलात्मक वस्तूंची निर्मिती करून उमंग क्रिएशन स्टुडिओ येथे विक्री करणाऱ्या यशस्वी उद्योजिका मूकबधीर उमा जोशी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या प्रदर्शनाचे संयोजन रंजना आठल्ये, रेखा कानिटकर, आरती पटवर्धन, माधुरी पाटणकर, शुभदा करंदीकर, गीता पटवर्धन यांनी केले.

यावेळी दिव्यांग व्यक्तींनी करमणुकीचे कार्यक्रम देखील सादर केले. सन २००३ पासून दिव्यांग व्यक्ती, त्यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्था आणि सामान्य नागरिक यांच्यात परस्पर संवाद व सहकार्य निर्माण करण्याच्या उद्देशाने समविचारी मैत्रिणींच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविला जात आहे.

वयवर्षे १८ ते ८० या वयोगटातील विविध प्रकारचे अपंगत्व असलेल्या व्यक्तींना त्यांनी तयार केलेल्या कलात्मक व उपयुक्त वस्तू तसेच खाद्यपदार्थ मांडून त्यांची विक्री करण्याची संधी प्रदर्शनातून मिळते. दृष्टीहीन व्यक्ती प्रात्यक्षिक सादर करणार आहेत. नागरिकांनी मोठ्या संख्येने प्रदर्शनास भेट देऊन दिव्यांग कलाकारांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading