स्पेनमध्ये होणाऱ्या एफआयएम मोटोज्युनिअर जागतिक अजिंक्यपद शर्यतीमध्ये भारतीय रेसिंगपटू सार्थक चव्हाण सहभागी !!
नुकत्याच झालेल्या मे आणि जुन महिन्यांच्या या स्पर्धांच्या पहिल्या आणि दुसऱ्या शर्यतीमध्ये सार्थक याची कामगिरी त्याच्या नावलौकिकासारखी होऊ शकली नाही. पहिल्या रेसमध्ये त्याची मोटार बाईक ‘क्रॅश’ झाल्यामुळे आणि दुसऱ्या शर्यतीमध्ये इंजीन फेल झाल्यामुळे त्याला दोन्ही शर्यतीमधून बाहेर पडावे लागले होते. दोन्ही शर्यतींमध्ये सार्थक याला तांत्रिक कारणांमुळे शर्यत पूर्ण करता आली नाही. पण, या अपयशी अनुभवानंतर सार्थक पुन्हा एकदा जोरदार पुनर्रागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे.
या स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीपुर्वी बोलताना सार्थक म्हणाला की, पहिल्या व दुसऱ्या फेरीमध्ये झालेल्या गोष्टी मी आता विसरून गेलो असून या शर्यतीसाठी जोरदार तयारी केली आहे. या शर्यतीमध्ये जोरदार पुनर्रागमन करण्याची माझे प्रयत्न असून यासाठी मी खूप मेहनतही घेतली आहे. या रेसमध्ये मला सर्वोत्तम प्रदर्शन करावे लागणार आहे. हे आव्हान सोपे नसून मी पूर्णपणे एकाग्र राहिलो आणि अगदी शेवटच्या क्षणापर्यंत माझा स्वतःवरचा विश्वास कायम ठेवला तर मला यश नक्कीच मिळेल, असा विश्वास वाटतो.
याआधी थायलंडमध्ये झालेल्या ‘एफआयएम एशिया रोड रेसिंग चॅम्पियनशीप’ (एआरआरसी) स्पर्धेच्या ‘टीव्हीएस रेसिंग इंटरनॅशनल चॅम्पियनशीप’ या श्रेणीमध्ये पुण्यातील १९ वर्षीय आणि टिव्हीएस रेसिंग संघाच्या सार्थक चव्हाण याने दुसऱ्या फेरीतील दमदार पुनरागमनासह विजेतेपदाला गवणसी घातली होती. या स्पर्धेत तीन वेळेस विजेतेपद मिळवणारा सार्थक हा एकमेव भारतीय रेसिंगपटू ठरला होता.
डीओसी पुणे, लेगसी मोटर्स, केवायटी हेल्मेट्स, एच.ओ.एम., रायनॉक्स आणि प्लनेट डीएसजी यांनी सार्थकला पाठींबा दिला असून सपोर्ट करत आहे. पुण्यातील उद्योजक शशांक गुप्ता आणि मेहुल छेडा यांनी या रेससाठी सार्थकला पाठींबा दिला आहे. तसेच सार्थक हा साई जीमचे चेतन चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ‘फिटनेस’ सराव करत आहे. सार्थक याने वयाच्या चौथ्या वर्षी बाईक चालवायला सुरूवात केली आणि वयाच्या सहाव्या वर्षापर्यंत मोटोक्रॉस स्पर्धांमध्ये सहभागी होण्यास सुरूवात केली. सार्थकला प्रशिक्षक अमोद तळपदे यांचे मार्गदर्शन मिळत आहे.
