Friday, July 3, 2026
BusinessLatest News

किर्लोस्कर न्यूमॅटिककडून ‘तेझकॅटलिपोका ए ८००’ मॉडेल बाजारात उपलब्ध ; सेंट्रीफ्युगल कॉम्प्रेशन क्षेत्रात नव्या युगाची सुरुवात

पुणे – देशातील औद्योगिक एअर कॉम्प्रेसर क्षेत्रात किर्लोस्कर न्यूमॅटिक कंपनी ही आघाडीची कंपनी म्हणून ओळखली जाते. कंपनीने ‘तेझकॅटलिपोका ए ८००’ हे नवीन मॉडेल बाजारात आणले आहे. हे मॉडेल त्यांच्या सेंट्रीफ्युगल कॉम्प्रेसर श्रेणीतील महत्त्वाचे उत्पादन आहे. आज ३० जून रोजी कंपनीने पुणे येथे या नव्या मॉडेलची घोषणा केली.

‘तेझकॅटलिपोका ए८००’ हा मॉडेल ६०० ते ८०० सीएफएम क्षमतेचा देशातील पहिला संपूर्ण स्वदेशी बनावटीचा सेंट्रीफ्युगल एअर कॉम्प्रेसर आहे. स्वदेशी तंत्रज्ञानाच्या आधारे या मॉडेलचे डिझाइन आणि निर्मिती करण्यात आली आहे. या क्षमतेच्या सेगमेंटमध्ये अगोदर अशा पद्धतीची सेंट्रीफ्युगत कॉम्प्रेसन तंत्रज्ञानाची उत्पादने उपलब्ध नव्हती. ग्राहकांना आता हे नवीन मॉडेल पारंपरिक ड्राय स्क्रू कॉम्प्रेसरला कार्यक्षम तसेच विश्वासार्ह पर्याय उपलब्ध करून देईल. त्यामुळे उद्योगांना कार्यक्षम, किफायतशीर आणि दीर्घकालीन लाभ देणारा पर्याय उपलब्ध झाला आहे.

नव्या मॉडेलबद्दल किर्लोस्कर न्यूमॅटिक कंपनी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक अमन किर्लोस्कर यांनी आपले मत मांडले. ते म्हणाले, “आम्हांला ६०० सीएफएम ते ९८० क्षमतेतील किर्लोस्कर न्यूनॅटिकचा नवीन सेंट्रिफ्यूगल एअर कॉम्प्रेसर सादर करताना अत्यंत आनंद होत आहे. भारतात या क्षमतेच्या श्रेणीत उपलब्ध असलेल्या कॉम्प्रेसर्सपैकी हे सर्वात लहान आकाराचे मशीन आहे. आतापर्यंत सेंट्रिफ्युगल कॉम्प्रेशन तंत्रज्ञानाचा वापर हा प्रामुख्याने मोठ्या क्षमतेच्या यंत्रांमध्येच केला जात होता. हेच आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य मानले जात होते. मशीनचा आकार कमी होत गेल्यास त्याच्या एरोडायनॅमिक कार्यक्षमतेत तांत्रिक अडचणी निर्माण होतात. या आव्हानांवर मात करण्यासाठी आमच्या अभियंता टीमने अनेक वर्षे संशोधन केले. सातत्याने या पद्धतीवर काम केले. आम्ही इम्पेलरची रचना, बेअरिंग प्रणाली आणि नियंत्रण यंत्रणेमध्ये आवश्यक सुधारणा करून कमी क्षमतेच्या वापरासाठीही उच्च दर्जाची सेंट्रिफ्यूगल कार्यक्षमता मिळवण्यास यशस्वी झालो. डिझानमध्ये बदल घडवतानाच संपूर्णपणे संशोधनावर आधारित आणि अभियांत्रिकी कौशल्यातून विकसित केलेले हे स्वदेशी तंत्रज्ञान आहे. आम्ही हा कॉम्प्रेसर ग्राहकांना भेडसावणा-या समस्येवर प्रभावी उपाय म्हणून विकसित केला आहे. येथील उद्योग क्षेत्राच्या गरजा लक्षात घेत भारतातच या कॉम्प्रेसरची निर्मिती करण्यात आली आहे.”

उद्योग-व्यवसायांत आता उर्जेची बचत करणा-या आणि तेलमुक्त (ऑईलफ्री) कॉम्प्रेस्ट एअर सोल्यूशन्सची मागणी सातत्याने वाढत आहे. त्यामुळे कंपन्या आता हवेच्या दर्जेदार गुणवत्तेशी तडजोड न करता खर्च कमी करणा-या तंत्रज्ञानाला प्राधान्य देत आहेत. आतापर्यंत या क्षमतेच्या श्रेणीत प्रामुख्याने ड्राय स्क्रू कॉम्प्रेसरचा वापर केला जात होता. मात्र ‘तेझकॅटलिपोका ए ८००’ या मॉडेलमुळे या विभागात सेंट्रिफ्यूगल तंत्रज्ञानामुळे होणारे फायदे अनुभवता येणार आहेत. हे मॉडेल उद्योगांना कार्यक्षम तसेच अत्याधुनिक अभियांत्रिकी पर्याय उपलब्ध करून देते. ही प्रणाली सहज वापरता येईल, अशी रचना या निर्मितीप्रक्रियेत वापरण्यात आली आहे. शिवाय ही यंत्रणा संबंधित यंत्रणेला सहजरित्या जुळवता येते. परिणामी, यंत्रणा कमी वेळेत कार्यान्वित करता येते. हे मॉडेल वस्त्रोद्योग, औषधनिर्मिती, इलेक्ट्रॉनिक्स आणि सेमीकंडक्टर, वाहन आणि रसायन उद्योग तसेच अन्न-पेय प्रक्रिया उद्योगांसह विविध क्षेत्रांसाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास कंपनीच्यावतीने व्यक्त करण्यात आला.

तेझकॅटलिपोका  ८००ची वैशिष्ट्ये :

दोन टप्प्यांतील सेंट्रीफ्युगल कॉम्प्रेशन – या मॉडेलमध्ये दोन टप्प्यांची सेंट्रीफ्युगल कॉम्प्रेशन प्रणाली वापरण्यात आली आहे. उच्च कार्यक्षमतेच्या इम्पेलर डिझाइनमुळे हवेचा दाब योग्य प्रमाणात तयार होतो. वीजेची बचत होते. उत्पादन निर्मितीतील दैनंदिन खर्चात कपात होते.

एरोडायनॅमिक अनुकूल पेटंट – या मॉडेलमध्ये हवेच्या प्रवाहासाठी अनुकूल असलेल्या डिझाइनची निर्मिती करण्यात आली आहे. हे डिझाइन पेटंटसाठी विकसित करण्यात आले आहे. कंपनीच्या स्वतःच्या अभियांत्रिकी कौशल्यातून निर्मित या तंत्रज्ञानाच्या सुरक्षेसाठी पेटंट अर्ज दाखल करण्यात आले आहेत. हे तंत्रज्ञान हवेचा विरोध कमी करून मशीनची क्षमता वाढवते.

एकात्मिक प्रवाह नियंत्रण यंत्रणा – या मॉडेलमध्ये एकात्मिक प्रवाह नियंत्रण यंत्रणा उपलब्ध असल्याने हवेच्या प्रवाहाच्या चढ-उताराचा स्तर ४५ टक्क्यांपर्यंत राखता येतो. उत्पादन निर्मिती क्षेत्रात प्रत्येक उत्पादनानुसार हवेच्या प्रवाहाची गरज भासते. ही नियंत्रण यंत्रणा हवेच्या बदलत्या गरजेनुसार कॉम्प्रेसरची कामगिरी अचूकणे जुळवून घेते. हवेच्या प्रवाहाची मागणी कमी असल्यासही हे मशीन उत्तम कार्यक्षमतेने चालते. परिणामी, ऊर्जेचा अपव्यय टाळता येतो.

लहान रचना – या मॉडेलची रचना अतिशय लहान आणि आटोपशीर स्वरुपातील आहे. ही यंत्रणा कमी जागेतही सहज ठेवता येईल. कमी जागेत अधिक कार्यक्षमतेने काम करणारी ही रचना उद्योगांसाठी सोयीची ठरते.

तेलमुक्त ऑईलफ्री (ISO 8573-1 प्रमाणित): कॉम्प्रेसरमधील हवा ही क्लास ० आईल-फ्री (तेलमुक्त) दर्ज्याची आहे. या पद्धतीला आंतरराष्ट्रीय स्तरावरील ISO 8573-1 चे मानांकन मिळाले आहे. या प्रणालीमधील तेलाचे दूषित अंश मिसळत नाही. परिणामी शुद्ध हवा मिळते. महत्त्वाच्या औद्योगिक प्रक्रियांमध्ये उच्च दर्ज्याच्या तेलमुक्त हवेची आवश्यकता असते. ही प्रणाली या गरजेची पूर्तता करते.

स्मार्ट मॉनिटरिंग प्रणाली – स्मार्ट मॉनिटरिंग प्रणालीमुळे यंत्राच्या कार्यपद्धतीवर विना अडथळा लक्ष ठेवण्यास मदत होते. मशीनच्या कामगिरीची माहिती रिअल-टाइममध्ये उपलब्ध होते.

तंत्रज्ञानावर आधारित अभियांत्रिकी उपाय पुरविण्याचा ६० वर्षांहून अधिक काळ अनुभव असलेल्या किर्लोस्कर न्यूमॅटिकने या नव्या उत्पादनाच्या माध्यमातून आपल्या नावीन्यपूर्ण परंपरेला पुढे नेले आहे. हा उत्पादनाचा अनावरण कार्यक्रम नुकताच पार पडला. यावेळी प्रमुख पाहुण्यांसह विविध औद्योगिक क्षेत्रातील ग्राहक, संशोधन क्षेत्रातील भागीदार तसेच कंपनीचे चॅनेल भागीदार उपस्थित होते. किर्लोस्कर न्यूमॅटिकचे वरिष्ठ अधिकारी आणि व्यवस्थापन संघाचे अधिकारीही या कार्यक्रमाला उपस्थित होते.

मान्यवरांच्या औपचारिक स्वागताने कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्यानंतर ‘तेझकॅटलिपोका ए ८००’ या नव्या सेंट्रीफ्यूगल एअर कॉम्प्रेसरचे अनावरण करण्यात आले. यावेळी या कॉम्प्रेसरची रचना, कार्यक्षमता तसेच फायदे यांबाबतचे सादरीकरणही करण्यात आले. या कार्यक्रमाला किर्लोस्कर न्यूमॅटिकचे अध्यक्ष राहुल किर्लोस्कर यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले. विलो मॅदर एण्ड प्लॅट पंप्स प्रा.लि.चे मुख्य वैज्ञानिक अधिकारी डॉ. रवींद्र उतगीकर हे कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. औद्योगिक क्षेत्रातील तांत्रिक प्रगती आणि नवकल्पनांबाबत महत्वपूर्ण माहिती देत त्यांनी सर्वांना याबद्दल मार्गदर्शन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading