Saturday, July 4, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

मेधा कुलकर्णींवर गुन्हा दाखल करा : सुनील माने यांची मागणी

 

पुणे  : शनिवार वाड्यात छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज यांची जयंती तसेच संविधान दिन यासारखे कार्यक्रम करण्यास परवानगी द्यावी, त्याशिवाय महात्मा फुले यांच्या वाड्यात विनापरवानगी वटपौर्णिमा साजरी करणाऱ्या खासदार मेधा कुलकर्णी यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी राष्ट्रवादी कॉँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस व प्रवक्ते सुनील माने यांनी केली. याबाबतचे पत्र त्यांनी पुरातत्व आणि संग्रहालय संचालनालयांचे पुणे विभागाचे सहायक संचालक डॉ. विलास वाहाने तसेच केंद्रीय पुरातत्व विभाग पुणेचे वरिष्ठ संरक्षक सहाय्यक गजानन मंडावरे यांना दिले.
या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, महात्मा जोतिबा फुले यांच्या गंज पेठेतील ऐतिहासिक फुलेवाड्यामध्ये भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांच्यासह काही महिलांनी वटवृक्षाची पारंपारिक पूजा केली. वास्तविक फुलेवाडा हे राज्य संरक्षित स्मारक असल्याने तेथे कोणतेही धार्मिक कार्यक्रम होऊ नये हा प्रघात आहे. मात्र खासदार मेधा कुलकर्णी यांनी ही पद्धत बंद करून स्वत: तेथील महिलांसोबत वटवृक्षाची पूजा केली. अशाप्रकारची पूजा करण्यासाठी आपण परवानगी दिली होती का? दिली असल्यास ही परवानगी आपण कोणत्या नियमाने त्यांना दिली आहे याबाबत माहिती द्यावी. त्याचप्रमाणे आपण परवानगी दिली नसल्यास, विनापरवानगी धार्मिक विधी केली असल्यामुळे खासदार मेधा कुलकर्णी यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी सुनील माने यांनी पुरातत्व आणि संग्रहालय संचालनालयांचे पुणे विभागाचे सहायक संचालक डॉ. विलास वाहाने यांच्याकडे केली आहे.
त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमामुळे स्वराज्य निर्माण झाले. स्वराज्याच्या पैशांवर पुण्यातील ऐतिहासिक शनिवार वाडा बांधण्यात आला. ही वास्तु सध्या केंद्रीय पुरातत्व विभागाच्या ताब्यात आहे. या वाड्यामध्ये स्वराज संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांनी महाराजांची समाधी शोधून काढली ते महात्मा फुले, संविधानाचे शिल्पकार डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती तसेच ज्या संविधानावर हा देश चालतो हे संविधान ज्या दिवशी अंमलात आणले तो संविधान दिन हे सर्व शासकीय आणि सामाजिक दिवस आहेत. समाजात आणि शासकीय पातळीवरही ही मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम केले जातात. त्यामुळे हे कार्यक्रम शनिवार वाड्याच्या आतील बाजूस साजरे करण्यास परवानगी द्यावी अशी विनंती त्यांनी केंद्रीय पुरातत्व विभाग पुणेचे वरिष्ठ संरक्षक सहाय्यक गजानन मंडावरे यांच्याकडे केली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading