पाश्चात्त्य संगीताप्रमाणे भारतीय संगीतप्रकारांचाही जगभर प्रसार व्हावा – केतकी माटेगावकर
केतकी यांना बाबूलाल डाटा कलागौरव पुरस्कार प्रदान
पुणे – आपला देश विविध संगीतप्रकारांनी समृद्ध आहे. त्यामुळे एक संगीतसाधक म्हणून अधिकाधिक भारतीय संगीतप्रकार आत्मसात करावेत, असे वाटते. पाश्चात्त्य संगीताचा जगभर जसा प्रसार झाला आहे, तसाच भारतीय संगीतप्रकारांचाही प्रसार – प्रचार करता यावा, असे मनोगत प्रसिद्ध अभिनेत्री, गायिका व संगीतकार केतकी माटेगावकर यांनी व्यक्त केले.
माटेगावकर यांना ‘रंग माझा वेगळा’ या सांगीतिक कार्यक्रमात नुकतेच बाबूलाल डाटा कलागौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. पं. रघुनंदन पणशीकर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी रंजना व प्रशांत डाटा, धिमान डाटा उपस्थित होते. या पुरस्काराचे हे दुसरे वर्ष आहे. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात हा कार्यक्रम संपन्न झाला. लक्ष्मीनारायण चिवडाचे संस्थापक स्व. लक्ष्मीनारायण डाटा यांचे सुपुत्र स्व. बाबूलाल डाटा यांच्या नावाने सदर पुरस्कार डाटा कुटुंबीयांनी सुरु केला आहे. संगीत क्षेत्रातील उत्तम कामगिरीसाठी हा पुरस्कार देण्यात येतो.
सर्व संगीतप्रकारांचा आस्वाद घेता येणे, ही कलाकार म्हणून मला फार मोठी गोष्ट वाटते. करिअर म्हणून गाणे करण्यासोबत गाणे आनंदासाठी करावे, असे मला वाटते. विशेषतः अधिकाधिक भारतीय संगीतप्रकार शिकावेत आणि गाता यावेत, असे मला वाटते. एक स्त्री कलाकार म्हणून आपले संवेदनशील मन भोवताली घडणाऱ्या घटनांनी व्यथित होते. आजच माझ गाणं नसरापूर घटनेतील चिमुरडीला श्रद्धांजली म्हणून मी अर्पण करते, असेही त्या म्हणाल्या.
माटेगावकर पुढे म्हणाल्या, या पुरस्काराच्या निमित्ताने सुवर्णयोग जुळून आल्याची भावना आहे. आयुष्यात गुरू असणे नशिबात असावे लागते, आणि मी नशिबवान आहे. अवघा रंग एक झाला, या नाटकाच्या निमित्ताने मला पं. रघुनंदन पणशीकर यांच्यासारखे गुरू मिळाले. नाट्यसंगीत म्हणजे काय, हे त्यांच्यामुळे मला समजले. त्यांच्यामुळे केवळ गाणेच नव्हे तर विचारांमध्येही योग्य ते बदल घडतात, हे मी अनुभवले. अनेक वर्षांची त्यांची साधना, तपश्चर्या आणि गानसरस्वती किशोरीताईंच्या मार्गदर्शनाखाली लाभलेले संचित, तो वारसा ते अगदी सहजतेने पुढे नेत आहेत. ताईंची गायकी समजून घेत, स्वतःची शैली त्यांनी घडवली आहे, तो आदर्श आहे. त्यांच्याच आशीर्वादामुळे मलाही स्वतःची शैली मिळो, घडवता येवो. त्यांच्या हस्ते मिळालेला हा पुरस्कार मी आशीर्वाद म्हणून स्वीकारते.
पं. रघुनंदन पणशीकर म्हणाले, केतकीला मी गायिका म्हणून ओळखत होतो, पण अवघा रंग एक झाला, या नाटकाच्या निमित्ताने केतकी ही मल्टि टॅलेंटेड कलाकार आहे, हे माझ्या लक्षात आले. तिने केलेले दत्तगुरुंचे गाणे मी गायिलो आहे. तिने अशीच स्वररूपी ईश्वराची सेवा करत राहावी, रसिकांचा प्रतिसाद नक्की मिळेल.
