आज मुंबईत येणारे पाहुणे शिवतीर्थावर जातील का ? केसारकरांचा सवाल
मुंबई : विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीची ची तिसही बैठक आज आणि उद्या मुंबईमध्ये पार पडणार आहे. या बैठकीवरून शिवसेनेचे मंत्री दीपक केसरकर यांनी शिवसेना ठाकरे गटावर जोरदार निशाणा साधला आहे. ही मुंबई बाळासाहेबांच्या नावानं ओळखली जाते. मात्र त्यांचे विचार आज उद्धव ठाकरे पायदळी तुडवत आहेत. आज मुंबईत येणारे पाहुणे शिवतीर्थावर जातील का ? असा सवाल दीपक केसरकर यांनी केला आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, विरोधकांना घाबरून मोदींनी गॅसच्या किमती कमी केल्या हा दावाच मुळात हास्यास्पद आहे. काँग्रेसने केलेल्या भ्रष्टाचारामुळे यूपीए नाव बदनाम झालं, त्यामुळे यांना नावात बदल करावा लागला. या इंडिया नावामध्ये असलेले डॉट्स यांच्यामधील अंतर दर्शवत आहेत. केवळ भीतीपोटी हे सर्व पक्ष एकत्र आले आहेत. जेव्हा पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर होईल तेव्हा सगळे तुकडे-तुकडे होतील असं घणाघात दीपक केसरकर यांनी केला आहे.
दरम्यान आज आणि उद्या इंडियाची तिसरी बैठक मुंबईमध्ये होणार आहे. यापूर्वी इंडियाच्या दोन बैठका झाल्या आहेत. त्यातील एक बैठक बिहारमध्ये पार पडली होती. जीचं नेतृत्व बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केलं होतं. तर दुसरी बैठक बंगळुरूमध्ये काँग्रेसनं बोलावली होती. आता तिसरी बैठक उद्या मुंबईमध्ये पार पडणार आहे. या बैठकीमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीच्या रनणितीवर चर्चा होण्याची शक्यता आहे. या बैठकीच्या समन्वयकासाठी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.
