fbpx
Thursday, December 7, 2023
Latest NewsPUNE

अरविंद एज्युकेशन सोसायटीतील विद्यार्थ्यांनी बनविल्या वैविध्यपूर्ण राख्या 

पिंपरी  :  ‘सण आहे रक्षाबंधनाचा, नेत्रांच्या निरांजनाने भावाला ओवाळण्याचा’ या उक्तीप्रमाणे जुनी सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियम, भारतीय विद्यानिकेतन विद्यालय आणि ज्युनिअर कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी विविध कल्पना वापरून वैविध्यपूर्ण राख्या बनविल्या. या राख्या प्रशालेतील सर्व विद्यार्थिनींनी विद्यार्थ्यांना बांधत रक्षाबंधन सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तसेच भारतीय हॉकीला सुवर्णकाळ देणारे हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनानिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी मानवी मनोरे सादर केले.
 यावेळी संस्थेच्या अध्यक्षा आरती राव, सचिव प्रणव राव, भारतीय विद्यानिकेतनच्या मुख्याध्यापिका आशा घोरपडे, लिटल फ्लॉवर स्कुलच्या मुख्याध्यापिका नीलम पवार, लिटल फ्लॉवर प्री प्रायमरीच्या मुख्याध्यापिका पिंकी माणिकम, प्राचार्य शीतल मोरे, पर्यवेक्षिका स्मिता बर्गे, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
पहिली ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी रक्षाबंधनानिमित्त राखी बनवणे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थ्यांनी विविध युक्त्या वापरून रंगबिरंगी व वेगवेगळ्या आकाराच्या राख्या  बनविल्या. शाळेतील सर्व विद्यार्थिनींनी आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांना राख्या बांधून त्यांचे औक्षण केले. विद्यार्थ्यांनी विद्यार्थिनींना चॉकलेट भेट दिले.
संस्थेच्या अध्यक्षा आरती राव यांनी सांगितले, की आज समाजात नातेसंबंधाचे महत्त्व कमी होत असताना शाळेत असे सण समारंभ साजरे करणे गरजेचे आहे. समाजाच्या जडणघडणीत रक्षाबंधनाचा उपयोग व्हावा व आपापसात स्नेहमय वातावरण निर्माण व्हावे, या उद्देशाने रक्षाबंधन साजरा करण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांमध्ये खेळाविषयी जागृती व्हावी, या उद्देशाने विद्यार्थ्यांनी आकर्षक मानवी मनोरे उभारत कल्पकता दाखवून दिली.
रक्षाबंधनाचा हेतू काय व हा सण का साजरा केला जातो, याविषयीची माहिती शिक्षिका दीपा गायकवाड, मोनिका रामस्वामी, स्वाती तोडकर यांनी दिली. शिक्षिका दीपाली भदाणे व दर्शना बारी यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. नियोजन शिक्षिका शिल्पा पालकर, नीलम मेमाणे, क्रीडा शिक्षिका सुषमा पवार, अक्षय नाईक यांनी केले. सूत्रसंचालन अश्विनी शिसोदे व हेमाली जगदाळे यांनी केले.

Leave a Reply

%d