लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्तमंदिरात कल्पवृक्ष महोत्सव आणि चांद्रयान देखावा
पुणे : नारळीपौर्णिमा, रक्षाबंधनानिमित्त बुधवार पेठेतील लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिरावर चांद्रयान देखावा साकारण्यात आला. तसेच, मंदिरामध्ये भव्य पुष्पराख्या आणि नारळांची आरास करुन कल्पवृक्ष महोत्सव देखील साजरा करण्यात आला. दत्तमंदिराच्या दर्शनी भागात चांद्रयानाविषयी ही भव्य पुष्पसजावट साकारण्यात आली आहे. भारताच्या यशस्वी चांद्रयान मोहिमेला यामाध्यमातून शुभेच्छा देण्यात आल्या.
बुधवार पेठेतील कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे पुष्पराख्या-शहाळे यांची आकर्षक सजावट मंदिरात करण्यात आली. चांद्रयान देखाव्याचे सजावटीचे उद्घाटन चांद्रयान मोहिमेला सायबर सिक्युरिटी प्रदान करणा-या पुण्यातील क्विक हिल टेक्नॉलॉजीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.कैलास काटकर आणि आॅपरेशनल एक्सलन्स प्रमुख अनुपमा काटकर यांच्या हस्ते झाले.
यावेळी दत्तमंदिर ट्रस्टचे अध्यक्ष युवराज गाडवे, खजिनदार अॅड.रजनी उकरंडे, विश्वस्त अॅड.प्रताप परदेशी, अॅड.शिवराज कदम जहागिरदार, राजू बलकवडे आदी उपस्थित होते. काटकर कुटुंबियांच्या हस्ते दत्तमहाराजांना अभिषेक व आरती देखील करण्यात आली. ट्रस्टच्या धार्मिक व सामाजिक उपक्रमांबद्दल माहिती घेत त्यांनी समाधान व्यक्त केले.
पौर्णिमेनिमित्त नियमीत दत्तयाग प्रसाद व पूजा अष्टेकर यांच्या हस्ते संपन्न झाला. मंदिरात मोठया आकारातील पुष्प राख्या साकारण्यात आल्या आहेत. नारळी पौर्णिमेनिमित्त केलेली सजावट पाहण्याकरिता भाविकांनी मोठया संख्येने गर्दी केली. फुलांच्या सजावटीसह आकर्षक विद्युतरोषणाई हे देखील सजावटीचे वैशिष्टय होते.