डॉ.डी.वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय आणि संशोधन केंद्राच्या वतीने “EMINDIA २०२३” चे आयोजन
पुणे : डॉ. डी.वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय आणि संशोधन केंद्राच्या वतीने आपत्कालीन औषधविषयक ईएमइंडिया (EMINDIA) या १९व्या वार्षिक परिषदेचे आयोजन करण्यात आले. जागतिक अद्ययावत वैद्यकीय उपचार आणि आपत्कालीन औषधांच्या क्षेत्रातील प्रगती, नवकल्पना आणि दृष्टीकोन या विषयांवर लक्ष केंद्रित करण्यात आले. ही परिषद दक्षिण पूर्व आशियातील इमर्जन्सी अँड ट्रॉमाविषयक जागतिक आरोग्य संघटना सहयोग केंद्र, आपत्कालीन औषधविषयक जागतिक शैक्षणिक परिषद आणि ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एआयआयएमएस) नागपूर यांच्या सहकार्याने आणि अॅकेडेमिक कॉलेज ऑफ इमर्जन्सी एक्सपर्टस, इमर्जन्सी मेडिसिन असोसिएशन आणि INDUSEM च्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली.
या पाच दिवसीय परिषदेची सुरुवात २३ ऑगस्ट २०२३ रोजी आपत्कालीन औषध क्षेत्रातील तज्ञांची संवादात्मक कार्यशाळा आणि प्रशिक्षण सत्रांनी झाली. या सत्रांमध्ये INDUSEM चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सागर गाळवणकर, डॉ. संजीव भोई, संचालक, दक्षिण-पूर्व आशिया क्षेत्र डब्ल्यूएचओ कोलाबोरेटिंग सेंटर फॉर इमर्जन्सी अँड ट्रॉमा केअर, नागपूर एआयआयएमएस मधील शल्यचिकित्सा विभागाचे प्रमुख व विद्यार्थी कल्याण विभागाचे अधिष्ठाता डॉ. सिद्धार्थ पी. दुभाषी यांची प्रमुख उपस्थिती होते. यावेळी डीपीयू प्रायव्हेट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे प्रतिनिधी, क्रिटिकल केअर मेडिसिन विभागाच्या प्राध्यापिका आणि विभाग प्रमुख डॉ. कल्पना केळकर, इमर्जन्सी मेडिसिन विभागाच्या प्राध्यापिका आणि विभाग प्रमुख डॉ. वर्षा शिंदे, क्रिटिकल केअर मेडिसिन विभागाच्या प्राध्यापिका आणि सल्लागार डॉ. प्राची साठे, क्रिटिकल केअर मेडिसिन विभागाचे सहायक प्राध्यापक आणि प्रभारी सल्लागार डॉ. प्रशांत साखवळकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यंदाच्या या परिषदेची मुख्य संकल्पना रुग्ण-केंद्रित शिक्षण, संशोधन आणि रुग्णांचे आरोग्य व्यवस्थापन अशी आहे. या परिषदेदरम्यान, २६ ते २७ ऑगस्ट २०२३ या कालावधीत एका शैक्षणिक परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन डॉ. पी.डी. पाटील, कुलपती, डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठ, डॉ. यशराज पाटील, विश्वस्त आणि खजिनदार डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठ (अभिमत विद्यापीठ) यांच्या हस्ते आणि अमेरिकन अॅकॅडमी ऑफ इमर्जन्सी मेडिसिनचे अध्यक्ष डॉ. जोनाथन जोन्स, अमेरिकन अॅकॅडमी ऑफ इमर्जन्सी मेडिसिनच्या माजी अध्यक्षा डॉ. लिझा मोरेनो-वॉल्टन यांच्यासह अन्य प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत होईल.
या दीक्षा समारंभानंतर दोन दिवसीय परिषदेत या विषयातील तज्ञ आपले अनुभव सांगतील आणि सर्वच क्षेत्रातील आपत्कालीन औषधांच्या भूमिकेबद्दल मार्गदर्शन करतील. एआयआयएमएस, एसीईई आणि अमेरिकन अॅकॅडमी ऑफ इमर्जन्सी मेडिसिनसारख्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रमुख आरोग्य सेवा संस्थांमधील तज्ञ, चिकित्सक आणि डॉक्टर “भारत, अमेरिका आणि आपत्कालीन औषधांचे जग” या प्रमुख विषयांवर कार्यशाळा घेतील आणि भारतातील (इमर्जन्सी मेडिसिन क्षेत्रातील शैक्षणिक विकास आदी विविध मुद्द्यांवर चर्चा करतील.
या परिषदेत डॉक्टर, चिकित्सक आणि आरोग्यसेवा तज्ञ इमर्जन्सी मेडिसिनबाबतच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकतील. आपत्कालीन औषध, अल्ट्रासाऊंड केअर आणि आपत्कालीन कार्डिओलॉजी यासह नवीन तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा आणि नवकल्पनांच्या शक्यतांचा शोध घेतील, जेणेकरुन रूग्णांना कोविडनंतर झालेल्या बदलांबरोबर केलेल्या मूल्यमापनातून चांगले उपचार मिळू शकतील. तसेच नवी दिल्ली येथील एम्सचे आपत्कालीन शैक्षणिक विभागाचे संस्थापक प्रमुख डॉ. प्रवीण अग्रवाल यांच्या सन्मानार्थ राष्ट्रीय स्तरावरील निरंतर वैद्यकीय शिक्षण सत्राचे आयोजन केले जाईल. यात आपत्कालीन औषध क्षेत्रातील निवडक तंज्ञाचा समावेश असेल.
रुग्णांचे जीव वाचवण्यासाठी आवश्यक इमर्जन्सी मेडिसिन सल्लागारांची गरज पूर्ण करण्यासाठी, कौशल्य मेळाव्याचे आयोजनही करण्यात आले होते. यामध्ये कौशल्य-आधारित प्रशिक्षणाच्या अभिनव संकल्पनेवर आधारित कार्यशाळा घेण्यात आली. यात सहभागी झालेल्यांना आपत्कालीन औषधाशी संबंधित विशेष कौशल्यांचे प्रशिक्षण देण्यात आले.
काही अहवालांमधील निष्कर्षांनुसार, भारताची लोकसंख्या १.४ अब्ज असून, त्यासाठी एक लाख ४० हजार आपत्कालीन औषध चिकित्सकांची आवश्यकता आहे. यामध्ये मागणी आणि पुरवठा यात मोटी तफावत दिसून येते. सध्या या मागणीचा पुरवठा केवळ ५ टक्के दराने होत आहे. या पार्श्वभूमीवर, देशातील आपत्कालीन औषध या क्षेत्राची प्रगती जागतिक दर्जाची आणि जलदगतीने होण्यासाठी व अखंड आपत्कालीन औषध आणि आरोग्यसेवा सक्षम करण्यासाठी या परिषदेच्या आयोजकांनी देशातील सरकारी अधिकाऱ्यांना भेटणे अपेक्षित आहे.
डॉ.पी.डी. पाटील, कुलपती, डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठ (अभिमत विद्यापीठ) म्हणाले, “या परिषदेमुळे आपत्कालीन औषध क्षेत्रातील नवीन शक्यतांची दारे खुली करेल आणि भारतामध्ये याविषयीच्या गरजांबद्दल जागरूकता निर्माण होईल. आधुनिक तंत्रज्ञानयुक्त नाविन्यपूर्ण आरोग्य सेवा आणि प्रक्रियांवर विचारमंथन केले जाईल. आम्ही अशा अनेक परिषदांचे आयोजन करण्यासाठी आणि भारताला आंतरराष्ट्रीय दर्जाची मान्यता व आरोग्यसेवा आणि नवकल्पनांमध्ये नेतृत्व मिळवून देण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.”
डॉ. यशराज पाटील, विश्वस्त व खजिनदार, डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठ (अभिमत विद्यापीठ) म्हणाले, “आम्ही आरोग्य सेवा क्षेत्रात रुग्णकेंद्रित वैद्यकीय प्रगती करण्यावर सातत्याने लक्ष केंद्रित करत आहोत. आमच्या आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज रुग्णालयामुळे आम्हाला इमर्जन्सी मेडिसिनसारख्या वैशिष्ट्यपूर्ण सेवांशी सक्षमपणे जुळवून घेण्यास मदत होते. सध्याच्या काळात जागतिक स्तरावर हे क्षेत्र महत्त्वाचे ठरत आहे. जागतिक दर्जाच्या सुविधा, अत्याधुनिक पायाभूत सुविधा आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानासह, ‘प्रथम-रुग्ण’ हे उद्दिष्ट असलेले रुग्णालय म्हणून आम्ही स्वतःचे एक विशेष स्थान निर्माण करून, आम्ही आरोग्य सेवा क्षेत्रात दर्जा उंचावत आहोत.”
डॉ. भाग्यश्री पी. पाटील, प्र-कुलपती, डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठ (अभिमत विद्यापीठ) म्हणाल्या, “जगातील सर्वांत मोठ्या इमर्जन्सी मेडिसिन परिषदेचे आयोजन करण्याचा मान आम्हाला मिळाला याचा आम्हाला अभिमान आहे. आरोग्य सेवेमध्ये आपत्कालीन औषधांची वाढती मागणी नागरिकांच्या सर्वांगीण कल्याणासाठी आवश्यक आहे. सध्या, आपत्कालीन औषध क्षेत्रातील मागणीतील तफावत दूर करण्याची गरज आहे आणि ही परिषद त्याबाबतीत क्रांतीकारी बदल घडवून आणणारी ठरेल.”
डॉ. कल्पना केळकर, प्राध्यापिका आणि क्रिटिकल केअर मेडिसिनच्या विभागप्रमुख डीपीयू प्रायव्हेट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, पिंपरी, पुणे तसेच या परिषदेच्या सचिव आयोजिका म्हणाल्या, “एसीईई आणि INDUSEM च्या २० वर्षांच्या प्रदीर्घ प्रयत्नांना फळ मिळत असल्याचे दिसत आहे. आता आपत्कालीन वैद्यकीय विभाग स्थापन केले जात आहेत आणि या विषयावर केंद्रित पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रमुख आरोग्य सेवा संस्थांद्वारे सुरू केले जात आहेत. डॉ. डी.वाय. पाटील महाविद्यालय, रुग्णालय आणि संशोधन केंद्र हे असे हॉस्पिटल आहे, जिथे २०१३ मध्ये आपत्कालीन वैद्यकशास्त्रात पदव्युत्तर पदवी सुरू करण्यात आली. आम्ही जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांनी सुसज्ज आहोत. त्यामुळे आपत्कालीन प्रसंगी उपचार करण्यास आम्ही सक्षम आहोत.”
INDUSEM चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि एसीईईचे अध्यक्ष डॉ. सागर गाळवाणकर म्हणाले, “देशातील नागरिकांच्या हितासाठी आपत्कालीन औषध क्षेत्र आणि आपत्कालीन औषधसेवा विकसित करण्यासाठी INDUSEM ने ही चळवळ सुरू करून आता २० वर्षे झाली आहेत. या १९ व्या वार्षिक परिषदेद्वारे, आपत्कालीन औषध क्षेत्रातील तज्ञांना चर्चा करण्यासाठी आणि ज्ञानाची देवाणघेवाण करण्यासाठी एका व्यासपीठावर एकत्र आले. आपत्कालीन औषधांच्या पायाभूत सुविधांच्या भविष्याला आकार देण्याच्या उद्देशाने शिक्षण, विकास आणि नवकल्पनांची एक परिसंस्था तयार केली आहे.”
डॉ. संजीव भोई, संचालक, दक्षिण-पूर्व आशिया क्षेत्र डब्ल्यूएचओ कोलाबोरेटिंग सेंटर फॉर इमर्जन्सी अँड ट्रॉमा केअर, म्हणाले, “आपत्कालीन औषधांच्या महत्त्वाबाबत जनजागृती वाढत आहे. अनेक वैद्यकीय महाविद्यालये हा विभाग स्थापन करत आहेत. तथापि, प्रशिक्षित शिक्षकांच्या कमतरतेमुळे या विषयाच्या अध्यापनात अडथळे येत आहेत. ही परिषद भारतातील आपत्कालीन औषध क्षेत्राच्या वाढीचा वेग मंदावणे, अशा अनेक चिंताजनक समस्यांना दूर करण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल.”