Tuesday, June 16, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

कांदा प्रश्नावर राजकारण करू नका – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी विरोधकांना कांद्याच्या प्रश्नावर राजकारण न करण्याचे आवाहन केले. कांद्याच्या मुद्यावर कुणीही राजकारण करू नये. केंद्राने कांदा उत्पादक शेतक-यांना वा-यावर सोडले नाही. त्यामुळेच या प्रकरणी तातडीने २ लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे, असे ते म्हणाले. या प्रकरणी सरकारवर टीका करणा-या शरद पवारांना त्यांनी ते १० वर्षे देशाचे कृषिमंत्री होते, अशी आठवणही करून दिली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे बोलताना म्हणाले की, केंद्र सरकारने शेतक-यांना वा-यावर सोडले नाही. कांदा खरेदीबाबत आमची केंद्र सरकारशी चर्चा झाली आहे. त्यानंतर इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात कांदा खरेदी केली जात आहे. केंद्राचा हा निर्णय शेतकरी आणि ग्राहकांना दिलासा देणारा आहे. सरकार सुमारे १० लाख मेट्रिक टन कांदा साठविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सूतोवाचही त्यांनी यावेळी केले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांचे आभारही मानले.

एकनाथ शिंदे म्हणाले की, अनिल काकोडकर समितीच्या शिफारशीचे काम सुरू आहे. सरकारला उत्पादक आणि ग्राहकांचा विचार करावा लागतो. केंद्र सरकार शेतक-यांच्या मदतीला धावून जाते. कांदा साठविण्यासाठी उपाययोजना करणार, कांद्यांच्या प्रश्नावर पीयूष गोयल यांच्याशी चर्चा केली असून कांद्याच्या अनुदानात वाढ करणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. आखाती देशात कांदा निर्यात जास्त असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.

एकनाथ शिंदे म्हणाले की, कांद्याची साठवणूक वाढविण्यासाठी राज्यात कांदा महाबँक ही संकल्पना राबवण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. अनिल काकोडकर समितीच्या शिफारशींवर काम सुरू आहे. राज्यात १३ ठिकाणी कृषि समृद्धी प्रकल्प उभे राहत आहेत. त्यामध्ये रबी कांद्यासाठी दहा लाख टन इतकी साठवणूक क्षमता उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. यातून प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे ६० हजार पेक्षा जास्त रोजगार निर्माण होऊ शकतात, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading