Wednesday, May 6, 2026
Latest NewsPUNE

विसंवादाच्या भिंती दूर करून शुद्ध धर्माचा संवाद शक्य : डॉ. श्रीपाल सबनीस

पुणे : धर्माधर्मातील विसंवादाच्या भिंती दूर सारून त्या पलिकडे शुद्ध धर्माचा संवाद होऊ शकतो; तो शक्य आहे आणि तो आवश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले. संतांना धर्म नसतो, महापुरुषांना जात नसते त्यामुळे प्रत्येकातील चांगल्या गोष्टी स्वीकारून ईश्वरवादी आणि निरीश्वरवादी मानवतावाद या दोन्ही मानवतावादाची बेरीज करता आली पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
बाबा भारती प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ बौद्ध साहित्यिक बाबा भारती यांचा स्मृतिदिन आणि पुरस्कार प्रदान सोहळा आज   महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात डॉ. सबनीस यांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी आणि आंतरराष्ट्रीय उद्योग सल्लागार सचिन ईटकर यांच्या हस्ते डॉ. सबनीस यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. तसेच ॲड. प्रमोद आडकर यांचा धम्मभूषण, साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल ॲड. जयदेव गायकवाड, कवी उद्धव कानडे, पुरुषोत्तम सदाफुले, डॉ. संभाजी मलघे त्याचप्रमाणे डॉ. सुलक्षणा शिलवंत आणि चंद्रकांत कांबळे यांचा धम्मपद पुरस्काराने गौरव करण्यात आला. पुरस्कार वितरण सोहळ्याचे यंदाचे पहिले वर्ष आहे. पुरस्कारार्थी आणि मान्यवरांसह कार्यक्रमाचे निमंत्रक, बाबा भारती प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेंद्र भारती व्यासपीठावर होते.
डॉ. सबनीस पुढे म्हणाले, सर्व मानवतावादाची पेरणी ईश्वरवादाने केली आहे. ईश्वर वैज्ञानिक दृष्टीकोनातून सिद्ध करता येणार नाही पण ईश्वरवादामध्येही मृत्यू आहे. निरीश्वरवाद्यांनाही मृत्यू आहे. दोन्ही प्रवाहातील वैगुण्य नाकारून आपल्याला माणसाच्या भल्यासाठी सर्व महापुरुषांच्या चांगुलपणाची बेरीज करण्याची गरज आहे.
अध्यक्षपदावरून बोलताना प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, देशाने निधर्मी लोकशाही स्वीकारली आहे परंतु या विचारधारेचे विस्मरण समाजकारणी, राजकारण्यांकडून होताना दिसत आहे. देव-धर्म या गोष्टी मानवनिर्मित असल्याने त्या माणसापेक्षा श्रेष्ठ होऊ शकत नाहीत. माणसा-माणसातील दिव्यत्वाचा परिचय करून देण्याचे काम करणे गरजेचे आहे. देशाला विचारकेंद्रीत लोकशाहीची खरी गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
ज्या लोकांना वैचारिक बैठक आहे, अशांनाच राजकारणात संधी मिळावी, अशी अपेक्षा सचिन ईटकर यांनी व्यक्त केली. गौतमबुद्ध यांच्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर खरे प्रज्ञावंत होते असे मत ॲड. जयदेव गायकवाड यांनी पुरस्काराला उत्तर देताना व्यक्त केले. रमाई महोत्सवाच्या माध्यमातून रमामाई आंबेडकर यांचे कार्य समाजापर्यंत पोहोचविणे हे आपले ध्येय असल्याचे ॲड. आडकर म्हणाले. सामाजिक मूल्यांच्या आधारावर भविष्यातील वाटचाल असेल असे उद्धव कानडे म्हणाले.
महेंद्र भारती यांनी मान्यवरांचे स्वागत करून प्रतिष्ठानच्या कार्याची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत चौगुले यांनी केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading