Monday, August 31, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील रुग्णालयात एका रात्रीत तब्बल १७ रुग्णांचा मृत्यू

ठाणे : ठाणे महापालिकेच्या कळवामधील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात शुक्रवारीच पाच रुग्णांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली होती. या घटनेला दोन दिवस उलटत नाही तोच आता एका रात्रीत या रुग्णालयात तब्बल १७ रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे या घटनांमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्याच ठाणे जिल्ह्यातील पालिका रुग्णालयांमधील अनागोंदी कारभार समोर आला आहे.

अपुरी डॉक्टर क्षमता आणि रुग्णांच्या संख्येत झालेली वाढ यामुळे एकच रात्री १७ रुग्णांना जीव गमवावा लागल्याचे समोर येत आहे. यातील १३ रुग्ण हे आयसीयू मधील तर ४ रुग्ण जनरल वॉर्ड मध्ये होते. रुग्णालयातील प्रशासनाने या बातमीला दुजोरा दिला आहे. दरम्यान, काही रुग्ण खासगी हॉस्पिटलमधून शेवटच्या क्षणी आल्याने आणि काही रुग्ण ८० पेक्षा जास्त वयाचे असल्याने मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे.

दरम्यान, ठाण्यातील सिव्हील रुग्णालय बंद असल्याने सर्व ठाणे जिल्ह्यातील रुग्ण या ठिकाणी उपचारांसाठी येत आहेत. त्यासाठी डॉक्टर आणि वैद्यकीय यंत्रणा कमी पडत असल्याची स्थिती आहे. त्यामुळे शुक्रवारी १० तारखेला एकच दिवशी ५ जणांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड आणि इतर पक्षांनी रुग्णालयात जाऊन रुग्णालयाची पाहणी केली होती. आता केवळ शनिवारी रात्री १०.३० पासून सकाळी ८.३० पर्यंत १७ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

दरम्यान, शुक्रवारी ज्या रुग्णांचा मृत्यू झाला होता, त्यांच्या नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. रुग्णांना तपसण्यासाठी डॉक्टर येत नव्हते, रुग्णांना वेळेवर औषध दिले जात नव्हते, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. रुग्णालयात उपचार न मिळाल्यानेच रुग्णांचा मृत्यू झाल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading