Saturday, May 9, 2026
Latest NewsPUNE

व्याधीग्रस्त  वारांगनांना  पोषण आहार वाटप वर्षपूर्ती 

पुणे : सारेच दगड निष्प्राण नसतात, काही शापित अहिल्या असतात… असे ज्यांचे वर्णन केले जाते, त्या बुधवार पेठेतील  वारांगनांना  पोषण आहार देऊन त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता पुणेकरांनी पुढाकार घेतला. श्री भगीरथ तापडिया ट्रस्ट, महा एनजीओ फेडरेशन, मंथन फाउंडेशनतर्फे ९० व्याधीग्रस्त वारांगणांना वर्षभर पोषण आहार देण्यात आला.

बुधवार पेठेत झालेल्या पोषण आहार वाटप वर्षपूर्ती कार्यक्रमात महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा, सामाजिक कार्यकर्त्या अंजली तापडिया, श्री भगीरथ तापडिया ट्रस्टचे राजेंद्र तापडिया, आशा भट, चेतन शर्मा, महा एनजीओ फेडरेशनचे ज्येष्ठ संचालक मुकुंद शिंदे, राहुल जगताप, पायल मुजुमदार, अपूर्वा करवा, स्वप्नील पाटील, विठ्ठल काळे आदी यावेळी उपस्थित होते.

शेखर मुंदडा म्हणाले, आर्थिक, सामाजिक आणि इतर अनेक कारणांमुळे अनेक  वारांगनांना  देहविक्री व्यवसाय करावा लागतो, अशा महिलांना समाज दूर ठेवतो. या महिलांमध्ये आपण आर्थिकदृष्ट्या सबल होऊ शकतो आणि आपण आपल्या पायावर उभे राहून सन्मानाने जीवन जगू शकतो, हा आत्मविश्वास निर्माण करण्याची गरज आहे.

अंजली तापडिया म्हणाल्या, जर महिला आर्थिकदृष्ट्या सबळ झाल्या, तर त्यांना समाजामध्ये सन्मान मिळू शकतो. या महिलांनी आपले कलागुण वापरून स्वतःच्या पायावर राहण्याची इच्छा आहे, त्या महिलांना आम्ही शिवणकाम आणि इतर अनेक व्यवसाय सुरू करण्यासाठी निश्चितच मदत करू. यांना मदत करणे हे मी कर्तव्य समजते.

राजेंद्र तापडिया म्हणाले,  वारांगनांना मदत केल्यामुळे मानसिक समाधान मिळते. मी महा एनजीओ फेडरेशनचा अत्यंत आभारी आहे की त्यांनी या कामामध्ये आम्हाला सहभागी होण्याची संधी दिली. त्यांचे काम हे वरवरचे नाही तर ज्या लोकांना या कामाची गरज आहे त्यांच्यापर्यंत महा एनजीओ चे काम निश्चित पोहोचते.

आशा भट म्हणाल्या, एचआयव्ही बाधितांबरोबरच ट्रक ड्रायव्हर, स्थलांतरित कामगार यांच्यासाठी आम्ही काम करीत आहोत. अशा लोकांना समाजाचा मुख्य प्रवाहामध्ये आणण्याची गरज आहे.  वारांगणांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करून समाज आपली जबाबदारी झटकत आहे. परंतु  वारांगणांना या समाजाचाच एक भाग आहे हे समाजाने लक्षात ठेवले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. अमोल उंबरजे यांनी सूत्रसंचालन व प्रास्ताविक केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading