सर्व आर्थिक उपक्रम सेवांसाठी, धोरण सल्लागार म्हणून सायरस पूनावाला समुहातर्फे केकी मिस्त्री यांची नियुक्ती
पुणे: फार्मास्युटीकल्स, बायोटेक्नोलॉजी, वित्त, स्वच्छ उर्जा, आदरातिथ्य, बांधकाम क्षेत्र, हवाई वाहतूक अशा विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या सायरस पूनावाला समूहाने केकी.मिस्त्री यांची धोरण सल्लागार म्हणून निवड केली आहे. श्री.केकी मिस्त्री यांनी एचडीएफसी लिमिटेडचे सीईओ आणि व्हॉईस चेअरमन हे पद भूषविलेले आहे. केकी मिस्त्री हे अदार पूनावाला यांच्या सर्व आर्थिक उपक्रम सेवांसाठी धोरण सल्लागार म्हणून काम करतील.
केकी मिस्त्री यांना आर्थिक क्षेत्रात काम करण्याचा 4 दशकांचा प्रदीर्घ अनुभव आहे. मिस्त्री यांचे नाव भारताच्या आर्थिक क्षेत्रामध्ये अत्यंत आदराने घेतले जाते. श्री.मिस्त्री यांनी 2010 सालापासून एचडीएफसी लिमिटेडचे सीईओ आणि व्हाईस चेअरमन म्हणून काम पाहिलेले आहे. एचडीएफसी बँकेसोबतच्या विलीनीकरणानंतर त्यांनी 30 जून 2023 पासून अतिरिक्त अकार्यकारी संचालक (गैर-स्वतंत्र) म्हणून काम पाहिले आहे. श्री.मिस्त्री हे एचडीएफसी एर्गो जनरल लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडचे अकार्यकारी चेअरमन देखील आहेत.
केकी यांचे समूहामध्ये स्वागत करताना पूनावाला फिनकॉर्पचे चेअरमन आणि सीरम इन्स्टीट्यूटचे सीईओ अदर पूनावाला यांनी म्हटले की, “ श्री.केकी यांना भारतीय वित्तीय सेवा क्षेत्रामध्ये संचालन कसे करावे, निर्णय कसे घ्यावेत याचा प्रचंड अनुभव आहे. सर्व वित्तीय सेवांच्या व्यवसायातील अस्थिरता लक्षात घेऊन योग्य ते व्यवस्थापन करणे, धोरणीपणे जोखीम व्यवस्थापन करत नफा वाढवण्यासाठी श्री.केकी मिस्त्री यांचा दीर्घ अनुभव उपयोगी ठरेल.”
केकी मिस्त्री यांनी म्हटले की, ” मी एचडीएफसीच्या कार्यकारी पदाच्या जबाबदारीतून बाहेर आलो आहे. व्यवसायातील उद्दीष्ट्ये गाठत असताना जबाबदार भागधारकांना त्यांचा परतावा मिळायला हवा, या उद्दीष्ट्याने ही कंपनी काम करत असून अदार यांच्या नेतृत्वाखालील वित्त सेवा व्यवसायासाठी सल्लागार म्हणून काम करण्याची जबाबदारी मिळाल्याने मला आनंद आहे. माझ्या संचालन कौशल्य आणि व्यवस्थापन क्षेत्रातील अनुभवाचा वापर करून तरुण आणि वेगवान चमूसोबत काम करण्यासाठी मी उत्सुक आहे. “
