डॉ. मीना वैशंपायन यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेचा डॉ. गं. ना. जोगळेकर पुरस्कार
पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे देण्यात येणारा डॉ. गं. ना. जोगळेकर पुरस्कार ज्येष्ठ संशोधिका आणि लेखिका डॉ. मीना वैशंपायन (मुंबई) यांना जाहीर झाला आहे. रोख रक्कम आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. हा पुरस्कार डॉ. वैशंपायन यांना ज्येष्ठ लेखक आणि अंतर्नाद मासिकाचे संपादक भानू काळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम सोमवार, दि. १४ ऑगस्ट रोजी सायं. ५.३० वा. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात होणार आहे अशी माहिती महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली.
प्रा. जोशी म्हणाले, ज्येष्ठ लेखिका डॉ. मीना वैशंपायन यांनी ‘द एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई’ या संस्थेत चौदा वर्षांहून अधिक काळ मानद उपाध्यक्ष व सचिव म्हणून प्रशासकीय व संशोधनात्मक काम केले. स्वलिखित, संशोधित, अनुवादित आणि संपादित अशी त्यांची वीस पुस्तके प्रकाशित आहेत. दुर्गा भागवत यांच्या साहित्याच्या संशोधनात्मक संपादनाची त्यांची सहा पुस्तके प्रकाशित झाली आहेत. दुर्गाबाई भागवत यांच्या ललितगद्याचा दृक् प्रत्ययवादी दृष्टिकोनातून चिकित्सक अभ्यास हा त्यांच्या प्रबंधाचा विषय होता. सरस्वती सन्मान या राष्ट्रीय पुरस्कार निवड समितीच्या सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले.
डॉ. वैशंपायन यांनी केलेले संस्थात्मक काम, लेखन आणि संशोधन यांचा या पुरस्काराच्या रूपाने सन्मान करताना परिषदेला आनंद व समाधान वाटत आहे.
