जागतिक क्षमा दिनाची स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी-यूएसए आणि २ एनझेड रेडिओ-ऑस्ट्रेलियातर्फे प्रसिद्धी
पुणे : अमेरिकेतील स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीने (विद्यापीठ) त्यांच्या प्रतिष्ठित वृत्तपत्रात साधू वासवानी मिशनच्या ‘जागतिक क्षमा दिन’ मोहिमेचे वैशिष्ट्य प्रकाशित केले आहे. जागतिक स्तरावर क्षमा, एकोपा आणि शांतता वाढवणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे. ऑस्ट्रेलियामध्ये ११८८-२ एन झेड रेडिओ स्टेशनवर जागतिक क्षमा दिनाबद्दलची माहिती अधिक ठळकपणे प्रक्षेपित करण्यात आली आहे.
साधू वासवानी मिशनचा वार्षिक उपक्रम असलेला दि.२ ऑगस्ट हा ‘जागतिक क्षमा दिन म्हणून साजरा केला जातो. आपल्या जीवनातील सर्व व्यक्तींना क्षमा स्वीकारण्यासाठी यानिमित्ताने एकत्र केले जाते. एक परिवर्तनकारी शक्ती म्हणून हा उपक्रम होत असतो. सन २०१२ मध्ये सुरू झालेली मोहीम एकमेकांबद्दल सहानुभूती वाढवते. शिवाय, वैयक्तिक आणि सामूहिकरित्या नातेसंबंधांना पुन्हा एकसंध करण्यास प्रोत्साहित करते.
विशेषत: पाश्चिमात्य देशांतील माध्यमांमध्ये ही मोहीम ठळकपणे प्रसिद्ध झाल्याने तिची व्याप्ती वाढण्यास मदत होत आहे. ज्यामुळे ‘माफीचे महत्त्व’ विषयावर जागतिक पातळीवर संवादाचे महत्त्वही अधोरेखित होत आहे.
याबाबत साधू वासवानी मिशनच्या कार्यकारी प्रमुख दीदी कृष्णा कुमारी जी म्हणाल्या, ‘स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीतर्फे मोहिमेची प्रसिद्धी आणि ऑस्ट्रेलियन रेडिओ प्रसारित मुलाखतीचे वैशिष्ट्य यामुळे अनेक तरुण मनांपर्यंत ही मोहीम पोहोचेल. जे शांतता आणि सौहार्दाच्या नवीन जगाचे निर्माते आहेत.’
तर, ‘आपल्या हृदयातील शांततेने जगामध्ये शांतता निर्माण होईल, अशी आमच्या मिशनचे संस्थापक दादा जे. पी. वासवानी यांची संकल्पना आहे,’ असे या मोहिमेच्या प्रवक्त्या अनिता सिंघानी म्हणाल्या.
