Monday, May 25, 2026
Latest NewsPUNE

समाजसंस्कृतीतील विविधता, एकात्मता टिकण्यासाठी दस्ताऐवजीकरणाची गरज

परिसंवादातील सूर : ‌‘सामवेदी ख्रिस्ती समाज : परंपरांचं दस्ताऐवजीकरण गरज की दूरदृष्टी?
पुणे : सामवेदी ख्रिस्ती समाजाविषयी केलेल्या संशोधनाद्वारे अनेक पैलू समोर आले आहेत. समाजसंस्कृती टिकण्यासाठी त्या संस्कृतीचे माध्यमांद्वारे वहन केल्यास त्या पुढील पिढीपर्यंत पोहोचणे शक्य होते. संस्कृतीतील विविधता आणि एकात्मता टिकण्यासाठी दस्ताऐवजीकरणाची गरज अधोरेखीत करण्यात आली.
विवेक साहित्य मंच आणि साहित्यदीप प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आणि विवेक प्रकाशन प्रकाशित दीपक जेवणे लिखित ‌‘चेहरा’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभानिमित्त ‌‘सामवेदी ख्रिस्ती समाज : परंपरांचं दस्ताऐवजीकरण गरज की दूरदृष्टी? या विषयावर आज (दि. 23) विशेष परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. स्वातंत्र्यवीर सावरकर अध्यासन केंद्रात आयोजित या कार्यक्रमात फादर फ्रान्सिस कोरिया यांनी ‌‘परंपरांच्या दस्ताऐवजीकरणाची गरज’, डॉ. संजय तांबट यांनी ‌‘परंपरांच्या दस्तावेजीकरणामागची दूरदृष्टी’ या विषयावर मांडणी केली. कवी, गझलकार रमण रणदिवे अध्यक्षस्थानी होते. दूरदृश्य प्रणालीद्वारे कोरिया परिसंवाद सहभागी झाले होते. आरती देवगावकर यांनी परिसंवादात मान्यवरांशी संवाद साधला.
विवेक साहित्य मंचच्या संयोजक डॉ. अर्चना कुडतरकर, साहित्यदीप प्रतिष्ठानच्या अध्यक्ष ज्योत्स्ना चांदगुडे, कार्याध्यक्ष धनंजय तडवळकर, पुस्तकाचे लेखक दीपक जेवणे यांची उपस्थिती होती.
रमण रणदीवे म्हणाले, प्रत्येक समाजातील संस्कृती पुढील पिढीपर्यंत पोहोचण्यासाठी साहित्यकृती उपयोगी ठरते. साहित्याद्वारे पुढे आलेले विचार मनात रेंगाळत राहतात.
फादर फ्रान्सिस कोरिया म्हणाले, सामवेदी समाजाविषयी सद्यस्थितीत माहिती, लेखन पुढे येत आहे; परंतु ते पुरेशा स्वरूपात उपलब्ध झालेले नाही. या समाजाविषयीच्या संशोधनानंतर सामवेदी बोलभाषा, म्हणी, वाक्‌‍प्रचार, उखाणे, लोकगीते, व्याकरण असे समृद्ध साहित्य समाजापुढे येत आहे. हे साहित्य पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी दस्ताऐवजीकरणाची गरज आहे.
डॉ. संजय तांबट म्हणाले, मुद्रित माध्यमे ही इतिहासकारांसाठी उपयुक्त ठरतात. ती दस्तऐवजीकरणाच्या प्रक्रियेतील महत्वपूर्ण भाग आहेत. कुठल्याही समाजाचा इतिहास, सांस्कृतिक संचित दस्तऐवजीकरणाच्या माध्यमातून पुढच्या पिढीकडे पोहोचविले जाते. सामवेदी आणि सामवेदी ख्रिस्ती समाज या दोहोतील समानता आणि भिन्नता या विषयी खोलवर अभ्यास होणे अपेक्षित आहे.
डॉ. अर्चना कुडतरकर यांनी विवेक साहित्य मंचच्या उपक्रमांची माहिती प्रास्ताविकात दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सायली शिगवण यांनी केले.
फोटो ओळ : विवेक साहित्य मंच आयोजित परिसंवादात सहभागी (डावीकडून) डॉ. संयज तांबट, रमण रणदिवे आणि दीपक जेवणे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading