राहुल गांधी यांनी घेतली शरद पवारांची भेट
नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी संध्याकाळी स्वत:हून शरद पवार यांच्या दिल्लीतील ६ जनपथ या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी खासदार सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी फूट पडली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपसोबत हातमिळवणी केली असून त्यांच्यासोबत पक्षाचे बहुमत असल्याचा दावा केला जात आहे. अजित पवार यांच्या या निर्णयाविरोधात शरद पवार आक्रमक झाले आहेत. त्यांनी दिल्लीत राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावलेली. ही बैठक संपल्यानंतर राहुल गांधी शरद पवार यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी दिल्लीत राष्ट्रवादी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावली. या बैठकीत ८ ठराव मंजूर करण्यात आले आहेत. यामधील सर्वात महत्त्वाचे पाऊल म्हणजे सर्व नेत्यांनी शरद पवार हेच आमचे प्रमुख नेते, असा ठराव बैठकीत घेण्यात आला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांना या बैठकीत निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे या सगळ्या घडामोडींनंतर शरद पवार यांच्या दिल्लीतील ६ जनपथ निवासस्थानी महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहेत.
