वनराईच्या वर्धापनदिनानिमित्त भरडधान्य, आदिवासी लोकसंस्कृती आणि निसर्गस्नेही वस्तूंचे प्रदर्शन
पुणे : वाढते शहरीकरण, औद्योगिकीकरण आणि बदललेली जीवनशैली यामुळे आपण निसर्गापासून दूर चाललो आहोत. निसर्गाच्या सानिध्यात जीवन जगणाऱ्या आदिवासी संस्कृतीबद्दलचे कुतूहल आजही कमी झालेले नाही. अनेकांना त्यांच्या पेहरावाचे, दागिन्यांचे, हस्तकलेचे, खाद्यसंस्कृतीचे, सणवार-रीतिरिवाजांचे तर काहींना त्यांच्या जीवन जगण्याच्या पद्धतीचे, त्यांना अवगत असलेल्या कलाकुसरीचे आकर्षण वाटते. त्यामुळे पर्यावरणपूरक जीवनशैलीचे आचरण करण्याची गरज लक्षात घेऊन वनराई संस्थेने यंदाच्या ३७ व्या वर्धापनदिनानिमित्त विशेष प्रदर्शनाचे आयोजन केले आले आहे. तसेच या प्रदर्शनात आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष २०२३ निमित्ताने प्रदर्शनात प्रामुख्याने विविध भरडधान्य (मिलेट्स), आदिवासी लोकसंस्कृती आणि निसर्गस्नेही वस्तू पाहायला मिळणार आहेत. सोमवार, दिनांक १० जुलै २०२२ रोजी पर्वती भागातील मित्रमंडळ चौक येथे वनराईच्या प्रांगणात सकाळी ११ ते रात्री ९ वाजेपर्यंत हे प्रदर्शन असणार आहे. हे प्रदर्शन विनामूल्य असून नागरिकांनी याचा लाभ घ्यावा व स्नेहमेळाव्यास उपस्थित राहून स्नेह वृदिंगत करावा असे आवाहन वनराईचे अध्यक्ष रवींद्र धारिया यांनी केले आहे.
सकाळच्या सत्रात विविध शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थी भेट देणार असून दुपारी ४ नंतरच्या सत्रात पुण्यासह राज्यभरातील विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी या प्रदर्शनास भेट देणार आहेत.पर्यावरण क्षेत्रातील तज्ज्ञांचे पर्यावरणस्नेही जीवनशैलीबद्दलचे अनुभव, विषमुक्त गोष्टींना वेगवेगळे पर्याय इत्यादीवर चर्चा यानिमित्ताने होणार आहे.
