Monday, May 25, 2026
Latest NewsPUNE

आपल्या पालकांना विश्वासात घ्या; पोलीस उपायुक्त संदिपसिंह गील यांचा तरुणांना सल्ला

पुण्यात ‘विद्यार्थी निकोप मैत्री चर्चासत्राचे’ आयोजन

पुणे : राष्ट्र सेवा दल व छात्रभारतीच्या वतीने पुण्यात ‘विद्यार्थी निकोप मैत्री चर्चासत्र’ आयोजित करण्यात आले होते. पुण्यामध्ये मागील काही दिवसात एकतर्फी प्रेम प्रकरणातून दोन विद्यार्थिनींवर जीव घेणे हल्ले झाले. ज्यामध्ये स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या दर्शना पवार हिला जीव गमवावा लागला. तर, सदाशिव पेठेत एका विद्यार्थिनीवर कोयत्याने हल्ला करण्यात आला. या दोन्ही घटनांच्या अनुषंगाने हे चर्चासत्र आयोजित केले होते.

या वेळी पोलीस उपायुक्त संदिपसिंह गील म्हणाले की, “आपण स्वतःला आधी ओळखायला हवं. आपण स्वतः पेक्षा इतर लोकांबद्दल जास्त जजमेंटल असतो. जीवन हे फक्त पुस्तकी शिक्षणावर अवलंबून नसून तुमची जडणघडण कशी झाली?, तुम्ही काय वाचता?, यावर अवलंबून असते. बदल हीच एकमेव कायम असणारी गोष्ट आहे. हे आपण लक्षात ठेवायला हवं आणि ते स्वीकारायलाही हवं. भावना धाग्याप्रमाणे असतात. जेवढे आपण त्यांना सुट्टे ठेऊ तेवढे चांगले परंतू त्यात गुंता झाल्यास ते सोडवणे अवघड असते.”

“आपल्या पालकांना आपल्या विश्वासात घ्या आणि आपल्या अडचणींमध्ये त्यांच्याशी संवाद साधा,” असा सल्ला त्यांनी उपस्थित तरुणांना दिला. तर, राष्ट्र सेवा दलाचे विश्वस्त प्रमोद मुजुमदार म्हणाले की, “निकोप म्हणजे काय हे समजून घ्यायला हवं. मानवी संबंधांमध्ये सत्तेची भावना निर्माण झाली की प्रश्न निर्माण होतात. नात्यात समानता हवी असमानता नको.”

या चर्चासत्रात आमदार कपिल पाटील, पुणे जिल्हाध्यक्ष प्रा. दिपाली आपटे, मानसोपचारतज्ञ डॉ. सुवर्णा बोबडे, छात्रभारतीच्या राज्य सचिव छाया काविरे, सलोखा अभियानाच्या समन्वयक निशा साळगावकर सहभागी झाले. कार्यक्रमाचे नियोजन निलेश निंबाळकर व राकेश नेवासकर यांनी केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading