Wednesday, June 3, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

अक्षयतृतीयेनिमित्त ‘दगडूशेठ’चा आंबा महोत्सव

पुणे : अक्षयतृतीयेनिमित्त दगडूशेठ गणपतीला ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य दाखविण्यासोबतच श्री गणेश आणि देवी शारदा यांच्या विवाह सोहळ्याचे आयोजन मंदिरात करण्यात आले. मंगलमूर्तींच्या भोवती केलेली आंब्यांच्या आरास आणि विवाह सोहळ्याचे साक्षीदार होण्याकरीता गणेशभक्तांनी मोठी गर्दी केली. साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षयतृतीयेच्या मंगलदिनी गणरायाचे दर्शन व्हावे, याकरीता भाविकांनी पहाटेपासून रांगा लावल्या होत्या.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिरात आंबा महोत्सव आयोजित करण्यात आला. यामध्ये गणपती बाप्पांना ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य अर्पण करण्यात आला. पुण्यातील आंब्यांचे सुप्रसिद्ध व्यापारी देसाई आंबेवालेचे संचालक मंदार देसाई यांच्यावतीने हा नैवेद्य देण्यात आला.

दुपारी भगवान श्री गणेश आणि देवी शारदा यांचा विवाह म्हणजेच शारदेश मंगलम् सोहळा थाटात पार पडला. सभामंडपात लग्नसोहळ्यातील सर्व धार्मिक विधींसह मंगलाष्टके देखील झाली. श्री गणेशांच्या दोन शक्तींना गाणपत्य संप्रदायात देवी सिद्धी आणि देवी बुद्धी या नावाने आळविले जाते. भगवंताच्या क्रियाशक्तीला देवी सिद्धी असे म्हणतात, तर भगवंताच्या ज्ञानशक्तीला देवी बुद्धी असे म्हणतात. अश्विन महिन्यामध्ये शरद ऋतू असल्याने या काळात प्रगट झालेल्या देवी बुद्धीला शारदा असे म्हणतात. शरद ऋतूतील चंद्राप्रमाणे तिची उज्ज्वलता, आल्हाददायकता असल्याने तिला शारदा असे म्हणतात. शरद ऋतू मधील प्रसन्नतेप्रमाणे देवी बुद्धीने प्रसन्नता प्राप्त होत असल्याने तिला शारदा असे म्हणतात. अशा देवी शारदेचा भगवान श्री गणेशांसोबतच्या महामीलनाचा सोहळा म्हणजे श्री शारदेश मंगलम आहे. वेदमूर्ती मिलिंद राहुरकर यांनी लग्नसोहळ्याचे पौरोहित्य केले.

मंदिरात मंगळवारी पहाटे ब्रह्मणस्पती सुक्त झाले. त्यानंतर प्रख्यात गायिका आशा खाडीलकर यांनी स्वराभिषेकातून गायनसेवा अर्पण केली. सकाळी ८ वाजता विशेष गणेशयाग झाला. वेदमूर्ती गणेशशास्त्री यांनी यागाचे पौरोहित्य केले. रात्री अखिल भारतीय महिला वारकरी मंडळाच्यावतीने उटीचे भजन देखील आयोजित करण्यात आले होते. आंब्याचा प्रसाद ससूनमधील रुग्णांना, श्रीवत्समधील मुलांना, अपंग सैनिक पुर्नवसन केंद्र खडकी, वृद्धाश्रम व दिव्यांग मुलांच्या संस्था व मंदिरात भाविकांना देण्यात येणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading