आत्मशोधातून व्हावे आत्मप्रकटीकरण : डॉ. रामचंद्र देखणे
पुणे : कथा, कविता आणि कादंबरीतून ललित साहित्याचे समृद्ध दालन उभे राहते. संवेदनांच्या जाणिवा जेव्हा अनुभूतीच्या परिघाने विस्तारतात तेव्हा कादंबरी जन्म घेते; तर अनुभवाच्या पाठीमागे दडलेली लौकिक जाणीव आत्मशोधातून आत्मकथेला जन्म देते म्हणून आत्मशोधातून आत्मप्रगटीकरण व्हावे, अशी अपेक्षा प्रसिद्ध साहित्यिक आणि संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांनी व्यक्त केली.
निवृत्त जिल्हा न्यायाधीश उत्तम दिक्कतवार यांच्या ‘पाउले चालती’ या आत्मकथनपर पुस्तकाचे प्रकाशन डॉ. देखणे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. बालशिक्षण मंडळाच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री पावश गणपती ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष मुरलीधर रायबागकर होते. माजी उपमहापौर, नगरसेवक दिलीप बराटे, मध्यवर्ती ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष मधुकर पवार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह वि. दा. पिंगळे, प्रा. सुधीर पिटके यांची प्रमुख उपस्थिती होती. पुस्तकविक्रीतून मिळणारा निधी श्री पावशा गणपती ज्येष्ठ नागरिक संघास मदतीच्या रूपाने दिला जाणार आहे.
डॉ. देखणे पुढे म्हणाले की, आत्मकथा लिहिताना पुष्कळवेळा अतिशयोक्तीचा वापर होतो, आपल्याला इतरांकडून कसा आणि किती त्रास झाला हे रंगवून सांगितले जाते. परंतु कलेचे विश्व वेगळे आणि सत्याचे विश्व वेगळे असे होत नाही, तर कलेच्या विश्वाला सत्याच्या विश्वात नेऊन सत्याचीच कलात्मक मांडणी करावी लागते. कारण वाङ्मयीन सत्य हे अनुभवसत्य असायला हवे. दिक्कतवार यांनी त्यांच्यातील ‘न्यायमूर्ती’ असणारी शांत भूमिका स्थिर ठेवूनच संयमीतपणे जीवनाची कथा मांडली आहे, ती अत्यंत स्वाभाविक आहे. त्यांच्यावर घडलेल्या वारकरी संप्रदायाच्या संस्कारातून त्यांच्या लेखनातही ही नैतिकता ठायी ठायी जाणवते. आजचे समाजचित्र पाहता प्रभाव पाडणारी एक नैतिक लोकसत्ता साहित्यातून प्रगट व्हावी आणि अशा वाङ्मयकृतीतून नैतिकतेची पाऊलवाट पुढे पुढे जात रहावी, अशी अपेक्षा डॉ. देखणे यांनी व्यक्त केली.
मधुकर पवार, सुधीर पिटके, मुरलीधर रायबागकर, प्रकाशक अशोक टिकेकर, शुभा संत यांनी मनोगत व्यक्त केले.
