Monday, June 22, 2026
PUNE

यंदा पुण्यातील गणेशोत्सवासाठी मंडप आणि देखावे उभारण्यास मनाई

पुणे, दि. ७ – यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईपाठोपाठ पुण्यात गणेश उत्सवासंदर्भात काटेकोर नियमावली तयार केली आहे. यासंदर्भात झालेल्या गणेश मंडळांच्या बैठकीत सर्वांची मते आणि सूचना जाणून घेतल्यानंतर जिल्हा प्रशासनाने ही नियमावली बनवली आहे. या बैठकीतील निर्णयाप्रमाणे गणपती बाप्पाच्याL मिरवणुकीसह बाप्पासाठी मंडप आणि देखावे उभारण्यास मनाई करण्यात आली आहे.

जिल्हा प्रशासनाने बोलावलेल्या या बैठकीत गणेश मंडळांनीही प्रशासकीय यंत्रणांकडून काही अपेक्षा व्यक्त केल्या. उत्सवाच्या बाबतीत कुणासोबतही दूजाभाव होऊ नये, शहरातील सर्व मंडळांसाठी सारखेच नियम असावेत, अशी मागणी या गणेश मंडळांनी केली. तसेच सर्वांना नियम सारखे असतील तरच सर्व गणेश मंडळांचे सहकार्य लाभेल, असे मत मंडळाच्यावतीने मांडण्यात आले आहे.

प्रशासनाने सर्व गणेश मंडळांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन केले. यंदा गणेश मंडळांनी शक्यतो कुठल्याच प्रकारचे मंडप उभारु नयेत. गणेश मंडळांनी मंदिरातच श्रींची प्रतिष्ठापना करावी, असे आवाहन पुणे पोलिसांनी केले आहे.

यंदा रस्त्यांवर गणपती मंडळांना श्रींची प्रतिष्ठापना करण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच मंदिर नसलेल्या मंडळांना मूर्ती ठेवत असलेल्या ठिकाणी प्रतिष्ठापना करण्यास सांगितले आहे. महापौराच्या अध्यक्षतेखाली गणेश मंडळ प्रतिनिधी आणि प्रशासन अधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading