Tuesday, August 25, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

राहुल गांधींना घाबरला भाजप, सत्ता टिकवण्यासाठी झाडत आहेत शेवटचे हातपाय: नाना पटोले

पुणे : भाजपला राहुल गांधींची भीती वाटत असून, त्यामुळेच त्यांच्या कार्यक्रमांना विरोध केला जात असल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी केला. भाजपचा जनतेवरील विश्वास उडाल्याची जाणीव सत्ताधाऱ्यांना झाली असून, सत्ता टिकवण्यासाठी ते शेवटचे हातपाय हलवत असल्याचा दावाही त्यांनी केला.

पुण्यात राहुल गांधी यांच्या ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पटोले यांनी भाजपवर जोरदार टीका केली. नुकत्याच घडलेल्या विद्यार्थ्यांवरील कथित मारहाणीच्या घटनेचा संदर्भ देत, कार्यक्रमाला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.“भाजपच्या मनात राहुल गांधींबाबत भीती निर्माण झाली आहे. राहुल गांधी ज्या राज्यात युवक आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधतात, त्या ठिकाणी भाजपच्या सत्ताधाऱ्यांना अस्वस्थता जाणवते. तीन राज्यांत हे चित्र पाहायला मिळाले असून महाराष्ट्रातही त्याचीच पुनरावृत्ती होत आहे,” असे पटोले म्हणाले.

राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांवरील अन्याय आणि युवकांच्या प्रश्नांविरोधात आवाज उठवला असून, त्यांना तरुणांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचा दावा पटोले यांनी केला. देशातील घटनात्मक व्यवस्था, सामाजिक न्याय आणि लोकशाहीच्या भवितव्याबाबत तरुणांमध्ये चिंता निर्माण झाली असल्याचेही त्यांनी सांगितले.
“राहुल गांधी हे केवळ माझे नेते नाहीत, तर ते देशाचे नेते आहेत. आज ते युवकांसाठी प्रेरणास्थान बनले आहेत. त्यामुळेच त्यांच्या कार्यक्रमांमुळे भाजपमध्ये अस्वस्थता निर्माण होत आहे,” असे पटोले यांनी नमूद केले.

महाराष्ट्राच्या सामाजिक आणि वैचारिक परंपरेचाही पटोले यांनी उल्लेख केला. फुले, शाहू आणि आंबेडकर यांच्या विचारांची भूमी म्हणून महाराष्ट्राची ओळख असून, सामाजिक न्यायाच्या चळवळीला पुण्याने मोठे योगदान दिले आहे, असे ते म्हणाले.
महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पुण्यातून स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. अशा सामाजिक परिवर्तनाच्या भूमीत राहुल गांधींचा कार्यक्रम रोखण्याचा किंवा तो अपयशी ठरवण्याचा प्रयत्न होणे दुर्दैवी असल्याचे पटोले यांनी सांगितले.
दरम्यान, भाजपच्या विरोधामुळेच राहुल गांधींच्या कार्यक्रमांना अधिक प्रसिद्धी मिळत असून, युवकांमध्ये काँग्रेसबद्दलचा प्रतिसाद वाढत असल्याचा दावाही पटोले यांनी केला. भाजपला आगामी काळात जनतेच्या नाराजीचा सामना करावा लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.:::

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading