Tuesday, October 13, 2026
Latest NewsPUNE

तालवाद्यांच्या फ्युजनमधून विद्यार्थ्यांची गुरूंना अनोखी मानवंदना

पुणे : गुरु-शिष्य परंपरेतून मिळालेल्या ज्ञानाचा आणि कलेचा वारसा वादनातून पुढे नेत चिमुकल्या विद्यार्थ्यांनी गुरूंना अनोख्या पद्धतीने गुरुदक्षिणा अर्पण केली. बोलवादन, तबला एकलवादन व युगलवादनासोबतच विविध देशांतील तालवाद्यांचा संगम घडविणाऱ्या फ्युजन सादरीकरणातून विद्यार्थ्यांनी कलेतील वैविध्य आणि तालवाद्यांची समृद्ध परंपरा उलगडली. महाराष्ट्राची ढोलकी, भारताचा तबला, युरोपचा काहोन आणि आफ्रिकेचा जेम्बे यांच्या संगमाने साकारलेल्या या सादरीकरणाला पुणेकर रसिकांची दाद मिळाली.

वादक पर्कशन्स अकॅडमीचे संचालक अमित अत्रे यांनी या विशेष सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन बालशिक्षण मंदिर सभागृहात केले होते. यावेळी गायिका पौर्णिमा दीक्षित, आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण घोडके, उप-पोलीस अधीक्षक वर्षा चौधरी, चौरे म्युझिकल्सचे संतोष चौरे तसेच मोहनीराज अत्रे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात तीन ते पाच वर्षे वयोगटातील चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या बोलवादनाने झाली. या विद्यार्थ्यांनी विविध बोलसमूह वाजवून दाखवत बोलवाद्यांची प्राथमिक ओळख करून दिली. त्यानंतर आदिमानवाच्या काळापासून तालवाद्यांचा झालेला उगम आणि तालाची संकल्पना याविषयी माहिती देण्यात आली.

तालाच्या मूलभूत स्वरूपापासून प्रगत स्वरूपाकडे वाटचाल करत विविध वयोगटांतील विद्यार्थ्यांनी तबल्यावरील कायद्यांचे सादरीकरण केले. ठराविक बोलांच्या रचनेवर आधारित आणि तालाच्या मात्रांमध्ये बांधलेल्या कायद्याची रचना व स्वरूप याविषयीही माहिती देण्यात आली. लहान वयोगटापासून मोठ्या विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांनी क्रमाक्रमाने कायदे सादर केले. विद्यार्थ्यांनी ढोलक वादनातून विविध ठेक्यांची ओळख करून दिली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी केलेल्या तबला युगलवादनाने उपस्थितांची दाद मिळवली. काही विद्यार्थ्यानीं तबला एकलवादन सादर करत या वाद्याच्या स्वतंत्र सादरीकरणातील सौंदर्य उलगडले.

मध्यंतरानंतर गायन आणि वाद्यवृंदाचा कार्यक्रम झाला. ‘देवगृही या भक्तजनांना’, ‘जय शारदे वागीश्वरी’, ‘गगन सदन’, ‘ससा तो ससा’, ‘हसता हुआ नूरानी चेहरा’, ‘होठों में ऐसी बात’ आदी चित्रपटगीते आणि भक्ती गीते सादर करण्यात आली. विशेष म्हणजे मुलांनी भारतीय आणि पश्चिमात्य वाद्यांचे एकत्रित फ्युजन केले.

यानंतर ‘ये मेरा दिल प्यार का दीवाना’, ‘छबीदार छबी’, ‘वाजले की बारा’ तसेच ‘हिंदू नृसिंह प्रभो शिवाजी राजा’ या गीतांनी कार्यक्रमाला रंगत आणली. त्यानंतर बक्षीस आणि पुरस्कार वितरण झाले. कार्यक्रमात गायन साथ वैदेही करंबेळकर, कीबोर्ड क्षितिज भट, निवेदन सृष्टी नवाथे यांनी केले. शेवटी संचालक अमित अत्रे यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading