Tuesday, October 13, 2026
Latest NewsPUNE

आंतरशालेय पोवाडा गायन स्पर्धेत महिलाश्रम हायस्कूल प्रथम

पुणे :  शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी, पुणे आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे यांच्या वतीने आयोजित आंतरशालेय पोवाडा गायन स्पर्धेत मोठ्या गटात महिलाश्रम हायस्कूल, कर्वेनगरने प्रथम क्रमांक पटकावला. डी. ई. एस. न्यू इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूलने द्वितीय, तर सद्गुरू श्री नारायण महाराज माध्यमिक विद्यालय, नारायणपूरने तृतीय क्रमांक मिळविला. लहान गटात न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग प्रशालेने प्रथम, शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी, पुणेने द्वितीय, तर पोदार इंटरनॅशनल स्कूल, चिंचवडने तृतीय क्रमांक मिळविला.

कै. शाहीर रत्न किसनराव हिंगे यांच्या जयंतीनिमित्त  शनिवार पेठेतील एन. ई. एम. एस. इंग्लिश मीडियम स्कूल, नवीन मराठी शाळेच्या प्रांगणात ही स्पर्धा झाली. ॲड. प्रमोद आडकर आणि नगरसेवक राघवेंद्र मानकर यांच्या हस्ते उद्घाटन झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आचार्य शाहिर हेमंतराजे मावळे होते.

शाहीर हेमंतराजे मावळे म्हणाले, पोवाडा ही केवळ मनोरंजनाची कला नसून व्यक्तिमत्त्व विकासाचे प्रभावी माध्यम आहे. विद्यार्थ्यांनी चांगले नागरिक घडण्यासाठी प्रयत्न करावेत. मिळालेल्या संधीचा योग्य फायदा घेऊन स्वतःच्या प्रगतीसाठी पुढे जाण्याचा प्रयत्न करावा. आपल्याला स्वतःच्या प्रयत्नांतून पुढे जायचे आहे. पोवाडा शिका आणि स्वतःला सिद्ध करा, असेही त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.

युवा लोकगायिका ईश्वरी बाविस्कर म्हणाल्या, रियाज आणि सातत्यपूर्ण सराव केल्यास निश्चितच पुढे जाता येते. आपल्या कलेमध्ये सातत्य ठेवणे गरजेचे आहे. निर्भयपणे सादरीकरण करता येणे, हेच खऱ्या अर्थाने यशाचे लक्षण आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नियमित सराव करून आत्मविश्वासाने आपली कला सादर करावी.

यावेळी परीक्षक म्हणून शाहीर किशोर धारासुरे आणि शाहीर जालिंदर शिंदे यांनी काम पाहिले.  हार्मोनियमवर बंडूपंत ढेंगळे, तालवाद्यावर तेजस वाघमारे आणि ढोलकीवर सक्षम जाधव यांनी साथसंगत केली.

अरुणकुमार बाभुळगांवकर यांनी आभार मानले,सूत्रसंचालन अक्षदा इनामदार व  नंदिनी देवकर यांनी केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading