Monday, October 12, 2026
Latest NewsPUNE

महिला वादकांच्या वादनातून वंदे मातरम् गीताला मानवंदना

पुणे : देशभक्तीची ऊर्जा, ढोल-ताशांचा दणदणता निनाद आणि तरुणाईचा उत्स्फूर्त सहभाग यांचा संगम साधत पुण्यातील विविध ढोल-ताशा वाद्यपथकांमधील महिला वादकांनी वंदे मातरम् गीताला अनोख्या पद्धतीने मानवंदना अर्पण केली. वंदे मातरम् या गीताला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित या उपक्रमातून राष्ट्रभक्तीची भावना जागवत मातृभूमीला अभिवादन करण्यात आले. संस्कृती आणि देशप्रेमाचा वारसा पुढे नेणाऱ्या महिला वादकांच्या सामूहिक वादनाने देशभक्तीचा निनाद घुमला.
ढोल ताशा महासंघ पुणे शहर आणि ढोल ताशा महासंघ महाराष्ट्र यांच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ढोल-ताशा वाद्यपथकांमधील महिला वादकांनी एकत्र येत वादनातून वंदे मातरम् गीताला मानवंदना दिली. यावेळी मिलिंद सबनीस, मोनिका मोहोळ, उद्योजिका जान्हवी धारिवाल बालन, अभिनेत्री आदिती द्रविड, मंजिरी सावरकर, ढोल ताशा महासंघ महाराष्ट्राचे अध्यक्ष पराग ठाकूर, पुणे शहर अध्यक्ष अक्षय बलकवडे, कार्याध्यक्ष अभिजित कुमावत, उपाध्यक्ष अमर भालेराव, खजिनदार मंदार गोसावी, सचिव प्रशांत तांबे, संघटक ओंकार कलढोणकर, कुमार रेणुसे आदी उपस्थित होते. पुणे शहरातील विविध ढोल-ताशा पथकांमधील २०० पेक्षा अधिक महिला वादकांनी सहभागी होत सामूहिक वादनातून वंदे मातरम् गीताला मानवंदना अर्पण केली.
मिलिंद सबनीस म्हणाले, वंदे मातरम् गीताला अशा पद्धतीने अभिवादन करणे हा वेगळा आणि सुंदर उपक्रम आहे. माते, तुला वंदन असो, असा या गीताचा भाव आहे. या एका गीताला बलिदानाचे अधिष्ठान लाभलेले आहे. त्यामुळे या गीताच्या शब्दांचे सामर्थ्य अधिक वाढले आहे. हे शब्द नष्ट होणारे नाहीत. या गीतावर मूर्तिपूजेच्या संदर्भातून टीका केली जाते; मात्र त्या पलीकडे जाऊन पाहिले, तर हे आईचे, मातृशक्तीचे गौरव करणारे गीत आहे. मातृशक्तीचे प्रतीक असलेल्या या गीताला आजच्या पिढीने अशा पद्धतीने अभिवादन करणे महत्त्वाचे आहे.
मोनिका मोहोळ म्हणाल्या, ढोल-ताशांचा निनाद झाला की मनामध्ये नवी उमेद निर्माण होते. सण-उत्सवांमुळे आपल्या परंपरा आणि संस्कृतीविषयी आदर निर्माण होतो. ढोल-ताशा वादनाच्या माध्यमातून तरुणाई आणि महिला आपल्या संस्कृतीशी जोडल्या जात असून, अशा उपक्रमांमधून हा सांस्कृतिक वारसा पुढे नेला जात आहे.
पराग ठाकूर म्हणाले, ढोल-ताशा वाद्यपथकातील सर्व वादक हे संस्कृतीरक्षक आहेत. परंपरा आणि संस्कृतीचे पालन करण्याचे काम ते करत आहेत. वादन करताना शिस्तीची मर्यादा राखून ढोल-ताशांचा निनाद आणि उत्तम वादन करा, असे आवाहन त्यांनी केले.
संजय सातपुते यांनी प्रास्ताविक केले. अजित जाधव यांनी सूत्रसंचालन करण्यात आले. अक्षय बलकवडे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading