Tuesday, August 25, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

‘छात्रो की गूंज’ कार्यक्रम रोखण्यासाठी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न; हर्षवर्धन सपकाळ

पुणे  : पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या काँग्रेसच्या ‘छात्रो की गूंज’ कार्यक्रमाला तरुणांनी उपस्थित राहू नये, यासाठी दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. कोरेगाव पार्क परिसरातील कालच्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर सपकाळ यांनी पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

काल आंदोलनाच्या नावाखाली गोंधळ घालणारे लोक अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते नसून भाजपचे कार्यकर्ते आणि भाडोत्री लोक होते, असा दावा सपकाळ यांनी केला. संबंधित लोक नशेत होते आणि त्यांनी जाणीवपूर्वक दंगलसदृश परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. परिस्थिती अधिक चिघळवून कर्फ्यू लावण्याची वेळ यावी, असा त्यांचा उद्देश असल्याचा आरोपही त्यांनी केला.
या प्रकरणात पोलिसांनी शनिवारी सकाळी गुन्हे दाखल केल्याबद्दलही सपकाळ यांनी आक्षेप घेतला. रात्री उशिरा घडलेल्या घटनेनंतर सकाळी गुन्हे दाखल करण्यात आल्याने कारवाईपूर्वी विचार करण्यात आला असल्याचे दिसते, असा दावा त्यांनी केला. काँग्रेसचे जे कार्यकर्ते घटनास्थळी उपस्थितही नव्हते, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.
घटनास्थळी पत्रकार आणि पोलीस उपस्थित होते. त्यामुळे संपूर्ण प्रकाराचे चित्रीकरण उपलब्ध असून वस्तुस्थिती सहज स्पष्ट होऊ शकते, असे सपकाळ म्हणाले. काँग्रेस कार्यकर्त्यांनी संयमाची भूमिका घेतली आणि हिंसाचार टाळला, तर विरोधी गटाकडून आक्रमक वर्तन आणि शिवीगाळ करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.

“आमच्या कार्यकर्त्यांची संख्या अधिक असतानाही त्यांनी संयम राखला. कायदा हातात कोणी घेतला, हे घटनास्थळावरील चित्रफितींमधून स्पष्ट होईल,” असे सपकाळ यांनी सांगितले.
पोलिसांनी वस्तुनिष्ठ कारवाई न करता राजकीय दबावाखाली कारवाई केल्याचा आरोपही त्यांनी केला. “चोर सोडून संन्याशाला फाशी देण्यासारखी कारवाई पोलिसांनी केली,” अशी टीका सपकाळ यांनी केली.
दरम्यान, कालच्या घटनेमुळे काँग्रेस आपल्या नियोजित कार्यक्रमापासून विचलित होणार नसून या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा केला जाईल, असेही हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading