‘छात्रों की गूंज’पूर्वी पुण्यात काँग्रेस-एबीव्हीपी कार्यकर्ते आमनेसामने; वडेट्टीवारांचा पोलिसांवर गंभीर आरोप
पुणे : काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या ‘छात्रों की गूंज’ या कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला पुण्यातील सीओईपी महाविद्यालय परिसरात काँग्रेस आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (एबीव्हीपी) कार्यकर्त्यांमध्ये शुक्रवारी रात्री जोरदार वाद झाला. दोन्ही गट आमनेसामने आल्याने काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला.
राहुल गांधी यांचा विद्यार्थ्यांशी संवाद साधणारा ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रम शनिवारी पुण्यात आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर काही विद्यार्थिनींनी माध्यमांशी संवाद साधत कार्यक्रमाला उपस्थित राहून आपले प्रश्न मांडण्याची भूमिका व्यक्त केली होती. याच मुद्द्यावरून काँग्रेस आणि एबीव्हीपीमध्ये वाद निर्माण झाल्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात आला आहे.
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी घटनास्थळी पोहोचून या प्रकरणावर भाष्य केले. काही विद्यार्थिनींवर दबाव आणून त्यांच्याकडून आधी केलेली विधाने मागे घेण्याचा प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. संबंधित विद्यार्थिनींनी यापूर्वी माध्यमांशी मोकळेपणाने संवाद साधला होता, असे वडेट्टीवार म्हणाले.
विद्यार्थिनीला तिचे मत व्यक्त करण्यापासून रोखणे किंवा दबावाखाली विधान बदलण्यास भाग पाडणे हा लोकशाही आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्रश्न असल्याचे त्यांनी म्हटले. “सत्य बोलल्यानंतरही दबावामुळे माफी मागावी लागली असेल, तर त्या मुलीचीच आपण माफी मागितली पाहिजे,” अशी भूमिका त्यांनी मांडली.
दरम्यान, सीओईपी परिसरातील झालेल्या वादानंतर पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांवर कारवाई केल्याचा आरोपही वडेट्टीवार यांनी केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, काँग्रेस कार्यकर्त्यांनी विद्यार्थिनींच्या संरक्षणासाठी आणि परिस्थिती शांत करण्यासाठी घटनास्थळी धाव घेतली होती. मात्र, पोलिसांनी त्यांच्यावरच बळाचा वापर केला.
या कारवाईत काँग्रेसचे दोन कार्यकर्ते जखमी झाल्याचा दावा वडेट्टीवार यांनी केला. त्यापैकी एका कार्यकर्त्याला हात-पायाला दुखापत होऊन रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. दुसऱ्या कार्यकर्त्यालाही गंभीर मार लागल्याचा दावा त्यांनी केला.
सत्ताधारी पक्षाशी संबंधित कार्यकर्त्यांवर कारवाई न करता काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवरच गुन्हे दाखल करण्यात आल्याचा आरोपही वडेट्टीवार यांनी केला. पोलिसांवर राजकीय दबाव असल्याचा दावा करत त्यांनी या कारवाईवर तीव्र नाराजी व्यक्त केली.
“लोकशाहीमध्ये बोलण्याचा आणि आपले मत मांडण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. केवळ आपला आवाज मांडणाऱ्या विद्यार्थ्यांवर दबाव आणणे योग्य नाहीअसेही वडेट्टीवार म्हणाले.
