पत्रकारितेमध्ये काम आणि माणुसकीमधील संघर्षात माणुसकीच अग्रस्थानी
पुणे : अनिश्चितता, धावपळ हे पत्रकारितेचे व्यवच्छेदक घटक आहेत. आधुनिक काळात करार पद्धतीमुळे असुरक्षितता हा घटकही या क्षेत्रात समाविष्ट झाला असला, तरी विविधता, संधींची उपलब्धता आणि सर्वसामान्यांपेक्षा वेगळा दिनक्रम, हेही या क्षेत्रात अनुभवता येते. पण व्यावसायिकता आणि माणुसकी, यात निवड करताना पत्रकारांनी, छायाचित्रकारांनी आजही माणुसकीची निवड केली आहे, हे महत्त्वाचे आहे, असा सकारात्मक सूर पत्रकारितेतील मान्यवरांनी येथे मांडला.
निमित्त होते, बेलवलकर सांस्कृतिक मंच आणि आशय फिल्म क्लबच्या सहयोगाने आयोजित विक्रम पटवर्धन दिग्दर्शित फ्रेम या चित्रपटाच्या विशेष खेळाचे आणि त्यानंतर झालेल्या चर्चेचे. पत्रकारिता – धावपळ आणि अनिश्चितता, या विषयावर झालेल्या चर्चेत ज्येष्ठ संपादक मुकुंद संगोराम, छायाचित्रकार पवन खेंगरे, महाराष्ट्र टाईम्सचे मुख्य वार्ताहर सुनीत भावे, पत्रकार प्रतिभा चंद्रन आणि दिग्दर्शक विक्रम पटवर्धन सहभागी झाले होते. राजेश दामले यांनी त्यांच्याशी संवाद साधला. बेलवलकर सांस्कृतिक मंचचे समीर बेलवलकर व आशय फिल्म क्लबचे सतीश जकातदार यावेळी उपस्थित होते.
संगोराम म्हणाले, पत्रकारितेत घटनेचे जसेच्या तसे वार्तांकन अपेक्षित असते, त्यासाठी पत्रकार आणि छायाचित्रकार यांना घटनास्थळी उपस्थित असणे अनिवार्य असते. या उपस्थितीला वेळ, काळ, स्थळाचे बंधन नसते. घटना दुःखद असो वा आनंदाची, छायाचित्रकार आणि बातमीदाराला नेमकेपणाने त्यातील कारुण्य वा आनंद टिपायचा असतो. ते क्षण जेव्हा फ्रेममध्ये नेमकेपणाने टिपले जातात, तेव्हा त्याची कलाकृती बनते. फ्रेममध्ये छायाचित्र असो, वा बातमी, ती वाचकाच्या मनात राहिली तर कलाकृती उत्तम जमली, असे म्हणता येते.
प्रतिभा चंद्रन यांनी माळीण दुर्घटना, मांढऱदेवी प्रसंग, मुंबईवरील दहशतवादी हल्ला, निवडणुकांचे वार्तांकन करताना आलेले अनुभव कथन करताना, जेव्हा व्यावसायिकता आणि माणुसकीमध्ये निवड करण्याची वेळ आली, तेव्हा नेहेमीच माणुसकीला अग्रक्रम दिल्याचे सांगितले. व्यावसायिक पत्रकार म्हणून असलेली जबाबदारी, कर्तव्ये पुरेपूर समजून, गरज असेल तिथे व्यवसाय बाजूला ठेवून माणुसकीलाच झुकते माप दिले पाहिजे. समयोचित निर्णय घेण्याचा विवेक महत्त्वाचा ठरत असल्याचेही त्या म्हणाल्या.
सुनीत भावे यांनी पत्रकारितेत सतत काहीतरी घडत-बिघडत असते. धावपळ, अनिश्चितता, बदल हे या क्षेत्राचे स्थायीभाव आहेत आणि पत्रकारांच्या दैनंदिन जगण्यातील आव्हाने काय असतात या निमित्ताने लोकांसमोर आले असे सांगितले. घटनास्थळी प्रत्यक्ष गेल्याशिवाय वास्तव माहिती मिळत नाही, ती मिळवण्यासाठी पत्रकार प्रयत्न करत असतात, असेही त्यांनी सांगितले.
पवन खेंगरे यांनी छायाचित्रकार म्हणून २० वर्षांची कारकीर्द घडताना राज्यस्तरीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी काम करण्याची संधी मिळाल्याचा उल्लेख केला. छायाचित्रकाराला नेहमीच संवेदनशील प्रसंगांना सामोरे जावे लागते. त्याच्यापाशी शब्द नसतात, फ्रेम असते. प्रसंग सुखद असो, वा दुःखद असो, फ्रेम सुंदरच असावी लागते, अशावेळी निर्णय घेणे आव्हानात्मक असते, असे ते म्हणाले. माळीण, वऱ्हाडाची बोट उलटून झालेले अनेक मृत्यू, आगीच्या घटना, रेस्क्यू ऑपरेशन्स…अशा अनेक वेळी छायाचित्रकार एकाच वेळी कर्तव्य आणि माणुसकी जपताना अनुभवले आहेत, असे ते म्हणाले.
दिग्दर्शक पटवर्धन म्हणाले, मी स्वतः छायाचित्रकार या नात्याने पत्रकारितेचा अनुभव घेतला आहे. तेथील अनिश्चितता, धावपळ अनुभवली आहे. पण आता चित्रपटांच्या क्षेत्रात आल्यावर इथेही धावपळ, अनिश्चितता आहे, याचा अनुभव घेत आहे. मात्र, जिथे माणूस म्हणून आपल्या मदतीची गरज आहे, अशा वेळी इतर भूमिका बाजूला ठेवून मदतीला पुढे होणे प्राधान्याचे आहे, असेच मत त्यांनी मांडले.
