Friday, August 28, 2026
ENTERTAINMENTLatest NewsPUNE

म्युझिक अँड मिरॅकल्स’मधून केदार मोरे यांच्या कॅन्सर उपचारासाठी होणार निधी संकलनाचा प्रयत्न

  • ६ सप्टेंबरला गणेश कला क्रीडा मंच येथे होणाऱ्या कार्यक्रमात संगीत क्षेत्रातील दिग्गजांचा असेल सहभाग

पुणे :  पुण्यातील प्रसिद्ध ढोलकीवादक केदार मोरे हे स्वादुपिंडाच्या (Pancreas) कॅन्सरशी झुंज देत असून, त्यांच्या उपचारासाठी लागणारा मोठा खर्च उभारण्यासाठी पुणे आर्टिस्ट फ्रेंड सर्कलतर्फे ‘म्युझिक अँड  मिरॅकल्स’ या विशेष निधी संकलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम रविवार, ६ सप्टेंबर, २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता गणेश कला क्रीडा मंच, पुणे येथे होणार आहे.

या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. कमलेश बोकील, योगेश सुपेकर, अमर ओक, सागर घोडके, मिलिंद कुलकर्णी  यांनी माहिती दिली.

केदार मोरे हे गेल्या अनेक वर्षांपासून संगीत क्षेत्रात कार्यरत असलेले गुणी ढोलकीवादक आहेत. अनेक दिग्गज कलाकारांचे रंगमंचीय कार्यक्रम तसेच संगीतकारांच्या ध्वनिमुद्रणांमध्ये त्यांच्या बहारदार ढोलकीवादनाने महत्त्वाची रंगत आणली आहे. सध्या ते स्वादुपिंडाच्या कॅन्सरने आजारी असून त्यांच्या उपचाराचा खर्च मोठा आहे. डॉ. कमलेश बोकील यांच्या माहितीनुसार, त्यांच्या उपचारासाठी अंदाजे ५० लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

-केदार हा आमचा मित्र आणि संगीत क्षेत्रातील अत्यंत गुणी कलाकार आहे. आज तो कॅन्सरशी लढा देत असताना त्याच्या या लढ्यात आपलाही खारीचा वाटा असावा, या भावनेतून ‘म्युझिक अँड  मिरॅकल्स’चे आयोजन करण्यात आले आहे. संगीताच्या माध्यमातून निधी उभारून केदारच्या उपचारासाठी हातभार लावण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे आयोजकांनी सांगितले.
या विशेष कार्यक्रमात डॉ. सलील कुलकर्णी, बेला शेंडे, केतकी माटेगावकर, रोहित राऊत, कवी संदीप खरे, वैभव जोशी तसेच प्रसिद्ध अभिनेता, गायक व दिग्दर्शक सचिन पिळगावकर यांच्यासह अनेक नामवंत कलाकार सहभागी होणार आहेत. अथर्व सुदामे यांचाही कार्यक्रमात सहभाग असणार आहे. विशेष म्हणजे पुण्यातील सुमारे ७५ वादक या कार्यक्रमात एकत्र येऊन केदार मोरे यांच्या उपचारासाठी आपले योगदान देणार आहेत.

संगीत क्षेत्रातील कलाकार, रसिक आणि पुणेकरांनी या उपक्रमाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देऊन केदार मोरे यांच्या उपचारासाठी मदतीचा हात पुढे करावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. सदर कार्यक्रमाची तिकिटे (डोनेशन पास)  तिकीट खिडकी, बुक माय शो या वेबसाईटवर, तसेच टिळक स्मारक मंदिर, बालगंधर्व रंगमंदिर व यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे उपलब्ध असतील असेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading