Wednesday, August 26, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

राहुल गांधींचा कार्यक्रम म्हणजे ‘छात्रों की गूंज’ नाही तर ‘पैसों की गूंज’!

  • भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा आरोप

राहुल गांधींचा पुण्यातील ‘छात्रों की गूंज’ नाही तर ‘पैसों की गूंज’ कार्यक्रम आहे. राहुल गांधींच्या कार्यक्रमाला लोक उत्स्फूर्तपणे येत नाहीत, म्हणून काँग्रेस पैसे देऊन गर्दी जमवत आहे. राहुल गांधींच्या कार्यक्रमातून काँग्रेसचे नवे पीपीपी मॉडेल म्हणजे ‘पेड पॉलिटिकल प्रोग्राम’ समोर आले आहे. असा गंभीर आरोप भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी व्हिडिओ पुरावे सादर करत केला आहे. मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी हा आरोप केला.

राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमासाठी समाजमाध्यमांवरील प्रभावशाली व्यक्तींना प्रत्येकी ३० ते ३५ हजार रुपये देण्याची ऑफर दिल्याचे व्हिडिओ समोर आले आहेत. कार्यक्रमाला उपस्थित राहणे, प्रवासाचा खर्च आणि समाजमाध्यमांवर कार्यक्रमाचा प्रचार करण्यासाठी पैसे देण्यासंदर्भात थेट व्हिडिओ पुरावे सादर करण्यात आले. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामागे नेमका कोणाचा हात आहे, याची चौकशी सरकारने करावी अशी मागणी नवनाथ बन यांनी केली.

राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी काँग्रेसकडून पैसे देऊन गर्दी आणि समाजमाध्यमांवर वातावरण तयार करण्याचा प्रयत्न सुरू आहे. हा विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त कार्यक्रम नसून काँग्रेसचा ‘पेड पॉलिटिकल प्रोग्राम’ आहे, असा घणाघाती आरोप भाजपने केला.

सुमारे ३ हजार लोकांना प्रत्येकी ३० ते ३५ हजार रुपये देऊन कार्यक्रमाला आणले जात असेल, तर त्यासाठी तब्बल ९ कोटी ते १० कोटी रुपये खर्च होतात. म्हणजे राहुल गांधींना पुन्हा राजकीयदृष्ट्या रिलाँच करण्यासाठी केवळ गर्दी जमवण्यावरच जवळपास दहा कोटी रुपयांचा खेळ सुरू असल्याचा आरोप नवनाथ बन यांनी केला.

“हा पैसा कुठून आला? कोण देत आहे? कोणाच्या माध्यमातून दिला जात आहे? या पैशांचा अधिकृत हिशोब काय आहे?” असे सवालही त्यांनी उपस्थित केले.

या पैशांच्या स्रोताची सखोल चौकशी झाली पाहिजे. या निधीचा फॉरेन फंडिंगशी काही संबंध आहे का? काँग्रेसशासित राज्यांमधील कंत्राटे, कमिशन किंवा इतर आर्थिक व्यवहारांमधून पैसा वळवण्यात आला आहे का? कोणत्या संस्था किंवा व्यक्तींमार्फत हा पैसा वितरित करण्यात आला आहे? याची निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी नवनाथ बन यांनी केली.

राहुल गांधींच्या राजकीय रिलाँच करण्यासाठी एकूण किती कोटी रुपये खर्च केले जात आहेत? विद्यार्थ्यांना आणि तरुणांना राहुल गांधींच्या विचारांवर विश्वास असेल, तर त्यांना पैसे देऊन कार्यक्रमाला आणण्याची गरज काय? असा सवालही त्यांनी केला.

आजपर्यंत पीपीपी म्हणजे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप माहिती होती. मात्र राहुल गांधींच्या कार्यक्रमातून काँग्रेसचे नवे पीपीपी म्हणजे ‘पेड पॉलिटिकल प्रोग्राम’ मॉडेल समोर आले आहे. विचारांचा प्रभाव नाही, जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद नाही आणि म्हणून पैशांच्या जोरावर गर्दी तसेच समाजमाध्यमांवर वातावरण निर्माण करण्याचा हा प्रयत्न असल्याची टीका भाजपने केली.

राहुल गांधींच्या नेतृत्वाला खरोखरच जनतेचा आणि विद्यार्थ्यांचा पाठिंबा असेल, तर प्रत्येक व्यक्तीला पैसे देऊन गर्दी जमवण्याची वेळ काँग्रेसवर का आली? या प्रश्नाचे उत्तर काँग्रेसने महाराष्ट्रातील जनता आणि देशातील विद्यार्थ्यांना द्यावे, असे नवनाथ बन यांनी म्हटले आहे.

काँग्रेसला भाजपचे थेट सवाल

१. पुण्यातील कार्यक्रमाला प्रत्येकी ३० ते ३५ हजार रुपये देण्यामागे नेमके कोण आहे?

२. सुमारे ३ हजार लोकांसाठी ९ कोटी ते १० कोटी रुपये खर्च होत असतील, तर हा पैसा कुठून आला?

३. या पैशांचा फॉरेन फंडिंगशी काही संबंध आहे का?

४. काँग्रेसशासित राज्यांमधील कंत्राटी व्यवहारातून किंवा कमिशनमधून हा पैसा वळवण्यात आला आहे का?

५. राहुल गांधींचं रिलाँच करण्यासाठी एकूण खर्च किती कोटी रुपयांचा आहे?

काँग्रेसने या सर्व प्रश्नांची उत्तरे द्यावीत. अशी मागणी भाजपने केली आहे

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading