Sunday, October 11, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

इन्स्टाग्रामवरील मैत्री ठरली घातक; महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर वर्षभर लैंगिक अत्याचार, चौघे ताब्यात


पुणे  : इन्स्टाग्रामवरून झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेत एका २१ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर वर्षभर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. या प्रकरणी वाघोली पोलिसांनी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले आहे.
पीडित विद्यार्थिनी पुण्यातील एका नामांकित महाविद्यालयात बी.ए.च्या प्रथम वर्षात शिक्षण घेत आहे. २०२५ मध्ये महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर तिची आरोपींपैकी एकाशी इन्स्टाग्रामवरून ओळख झाली. पुढे या ओळखीचे मैत्रीत रूपांतर झाले. या मैत्रीचा गैरफायदा घेत आरोपींनी तिला विविध ठिकाणी नेऊन तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.
अत्याचाराचे व्हिडीओ तयार करून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत आरोपींनी विद्यार्थिनीला गप्प राहण्यास भाग पाडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे भीतीपोटी ती तब्बल वर्षभर हा त्रास सहन करत होती. अखेर अत्याचाराला कंटाळून तिने वाघोली पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
पोलिसांनी तक्रारीच्या आधारे चारही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, आरोपींनी तयार केलेल्या कथित व्हिडीओसह अन्य पुराव्यांचीही पोलिसांकडून चौकशी केली जात आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading