विद्यार्थ्यांशी चर्चा करा, आंदोलन चिरडू नका; राज ठाकरेंचा केंद्र सरकारवर घणाघाती हल्ला
मुंबई : सोनम वांगचुक यांना जबरदस्तीने रुग्णालयात दाखल केल्याचा आरोप आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर झालेल्या कथित लाठीचार्जच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. विद्यार्थ्यांच्या रास्त मागण्यांकडे दुर्लक्ष न करता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्याशी थेट संवाद साधावा, अशी मागणी त्यांनी केली.
एका सोशल मीडिया पोस्टद्वारे राज ठाकरे यांनी सोनम वांगचुक यांच्या रुग्णालयात दाखल करण्याच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सरकारला वांगचुक यांच्या प्रकृतीची खरोखरच काळजी असती, तर त्यांना ज्या पद्धतीने रुग्णालयात नेण्यात आले, तसा प्रकार घडला नसता, असा दावा त्यांनी केला.
विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर करण्यात आलेल्या कथित बेफाम लाठीचार्जवरही ठाकरे यांनी संताप व्यक्त केला. “शांततेत प्रश्न विचारणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठ्या चालवायच्या, त्यांच्यावर दडपशाही करायची आणि त्यांच्या मागण्या ऐकून घ्यायच्या नाहीत, हा कसला कारभार?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावरूनही ठाकरे यांनी सरकारला लक्ष्य केले. “धर्मेंद्र प्रधान कोण लागून गेले की त्यांचा राजीनामा घेणे हे सरकारला स्वतःचे अपयश वाटते?” असा प्रश्न त्यांनी केला. मणिपूरमध्ये हिंसाचार सुरू असतानाही तत्कालीन मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांना केंद्र सरकारने संरक्षण दिल्याचा आरोपही त्यांनी केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना राज ठाकरे म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा मुख्य मुद्दा सोडून पंतप्रधान इतर सर्व विषयांवर बोलले. सत्तेच्या उत्तराधिकाराच्या राजकारणामुळे सरकार निर्णायक भूमिका घेण्यास टाळाटाळ करत आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
“तुम्ही ‘परीक्षा पे चर्चा’ करता. आता विद्यार्थ्यांशी चर्चा करा. त्यांच्या मागण्या रास्त आहेत. धर्मेंद्र प्रधान किंवा सरकारचा अहंकार यापेक्षा देशातील विद्यार्थ्यांचा आक्रोश महत्त्वाचा आहे,” असे आवाहन राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांना केले.
हे आंदोलन केवळ एका परीक्षेपुरते किंवा विद्यार्थ्यांपुरते मर्यादित नसल्याचेही त्यांनी म्हटले. महागाई, कथित उद्योगपतीधार्जिणी धोरणे, जंगलतोड, विकासाच्या नावाखाली वाढणारे शहरी प्रश्न आणि आरोग्य व्यवस्थेवरील वाढता ताण याविरोधातील व्यापक असंतोष या आंदोलनातून व्यक्त होत असल्याचा दावा त्यांनी केला.
श्रीलंकेतील २०२२ मधील विद्यार्थी आंदोलन, अरब स्प्रिंग, नेपाळमधील आंदोलने आणि जयप्रकाश नारायण यांच्या ‘संपूर्ण क्रांती’च्या आंदोलनाचा संदर्भ देत ठाकरे यांनी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या धैर्याचे कौतुक केले.
विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा यापूर्वीपासूनच पाठिंबा असून, पुढेही तो कायम राहील, असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. NEET सारख्या परीक्षांच्या पद्धतीत केंद्राने अनावश्यक हस्तक्षेप करू नये, अशी भूमिका MNS ने सुरुवातीपासून घेतल्याचेही त्यांनी नमूद केले.
