महाराष्ट्रात पुढील पाच दिवस पावसाचा जोर कायम; पुणे घाटमाथ्यासह अनेक जिल्ह्यांना अलर्ट
पुणे : महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून मुंबई, कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक भागांत पुढील काही दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने २१ ते २६ जुलैदरम्यान विविध जिल्ह्यांसाठी रेड, ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी केले आहेत.
गुजरातच्या किनारपट्टीजवळ निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचा परिणाम महाराष्ट्रातील हवामानावर होत असून उत्तर महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. २१ ते २५ जुलैदरम्यान गुजरात आणि उत्तर महाराष्ट्रावर नैऋत्य मोसमी वारे सक्रिय राहणार असल्याने कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे.
२२ जुलैला पुणे घाटमाथ्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. नाशिक आणि पुणे जिल्ह्याला यलो अलर्ट देण्यात आला असून मुंबई व सिंधुदुर्गलाही यलो अलर्ट आहे. तर रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, नाशिक तसेच सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. संपूर्ण विदर्भात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
२३ जुलैला संपूर्ण कोकण किनारपट्टी, मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक आणि कोल्हापूर घाटमाथ्यावर यलो अलर्ट असेल. पुणे आणि सातारा घाटमाथ्यासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. जळगाव, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांतही पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
२४ जुलैला ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा घाटमाथा आणि गोंदिया जिल्ह्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे. २५ जुलैला रायगड आणि पुणे घाटमाथ्यावर यलो अलर्ट असून त्यानंतर राज्यातील पावसाचा जोर हळूहळू कमी होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, पुढील २४ तासांत कोकण, दक्षिण-मध्य महाराष्ट्र आणि घाट परिसरात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस, तर विदर्भातील काही भागांत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
