Thursday, July 23, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

‘कर्जमाफीची पहिली यादी उद्या जाहीर होणार’ मुख्यमंत्री फडणवीस यांची महत्त्वाची घोषणा

 

मुंबई प्रतिनिधी

शेतकरी डोळे लाऊन असलेल्या कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणी बाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे. कर्जमाफी योजनेतील पहिली यादी बुधवारी जाहीर करण्यात येईल, असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. यामुळे लाभार्थी शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी 30 जून पूर्वी करण्याचे आश्वासन आधी देण्यात आले होते. मात्र, ते प्रत्यक्षात आले नाही. त्यातच या योजनेसाठी लाभार्थ्यांना काढण्यात आलेल्या अटी व शर्ती यांना विरोधकांनी व शेतकरी संघटनांनी विरोध केला. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी कोणत्याही अटी शर्तीविना शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी यासाठी आंदोलन केले.

या आंदोलनानंतर मुख्यमंत्री फडणवीस आणि रोहित पवार यांची बैठक पार पडली. या बैठकीत शेतकरी नेतेही उपस्थित होते. या सर्व घडामोडींमध्ये शेतकरी कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी सातत्याने लांबणीवर पडत गेली. त्यामुळे लाभार्थी शेतकऱ्यांमध्ये असलेली अस्वस्थता मुख्यमंत्र्यांच्या घोषणाने काही प्रमाणात दूर झाली आहे.

कॉकरोच जनता पक्षाने जंतर मंतर येथे केलेले आंदोलन आणि संसदेवर मारलेली धडक यावरही फडणवीस यांनी भाष्य केले. कोणत्याही आंदोलनात आपला स्वार्थ साधण्यासाठी काही अपप्रवृत्ती सहभागी होतात. या आंदोलनातही तेच झाले असून अशा लोकांनी पोलिसांवर हल्ले केले. त्यांच्या वाहनांची तोडफोड केली. आपल्याला सर्वांच्याच हेतूवर शंका घ्यायची नाही. मात्र, अशा अपप्रवृत्ती या आंदोलनात शिरल्या ही वस्तुस्थिती आहे, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. मुळात चांगले हेतूने सुरू झालेल्या आंदोलनात शिरून काही संघटना आणि राजकीय पक्ष अराजक वाजवण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

महाराष्ट्रातील लाडके दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून या प्रदर्शनात चित्रांच्या माध्यमातून दादांचा संपूर्ण जीवनपट मुख्यतः राजकीय कारकीर्द बघायला मिळणार आहे. विशेषतः दादांची हसरी मुद्रा, करारी मुद्रा या निमित्ताने पाहता येणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading